Breaking News

“त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला. ” ; श्रीकांत शिंदेंची बाबांसाठी भावनिक पोस्ट

राज्यात मुख्यमंत्री कोण होणार याच प्रश्नावर सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्रि‍पदाच्या मुद्द्यावर अंतिम निर्णय आलेला नाही. अशातच एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेत आपल्यामुळे कोणतीही अडचण होईल असं मानू नका म्हणत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर राज्यात एकच चर्चा सुरू झाली. याच सर्व पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांनी आपल्या वडिलांसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे.

मुख्यमंत्रीपदावरुन सुरू असलेला तिढा आणि त्यावरुन राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर सध्या देशाचं लक्ष लागून आहे. अशातच मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: आपली भूमिका जाहीर करत, निर्णय घेण्यासाठी मार्ग सोपा केला. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी आपल्या वडिलांच्या या निर्णयाबद्दल भावनिक पोस्ट लिहिली आहे.

“मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.
कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री. अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे.

सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर – गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. खूप अभिमान वाटतो बाबा!” असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *