Breaking News

लोकसभेनंतर सहा महिन्यांत लोकांचं मत कसं बदललं? बाबा आढावांच्या प्रश्नावर अजित पवार शरद पवारांचं उदारण देत म्हणाले…

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली. तसेच बाबा आढाव यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली आणि बाबा आढाव यांनी उपस्थित केलेल्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न केला.

अजित पवार म्हणाले, “बाबा आढाव म्हणत आहेत की लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत सहा महिन्यात लोकांचं मत इतक्या प्रमाणात कसं काय बदललं? पाच महिन्यांत जनतेचा कौल कसा काय बदलला? मला त्यावर आम्ही काय करू शकतो? १९९० च्या लोकसभा निवडणुकीवेळी देशातील जनतेने केंद्रात अटल बिहारी वाजपेयी (एनडीए) यांना पाठिंबा दर्शवला. परंतु, महाराष्ट्रात विलासराव देशमुख व आमचं (राष्ट्रवादी काँग्रेस) सरकार आलं. विलासराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले”.

अजित पवार म्हणाले, बारामतीच्या मतदारांचं उदाहरण द्यायचं झालं तर त्यावेळी दोन्ही निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. बारामतीतल्या मतदारांनी एकाच वेळी लोकसभेसाठी शरद पवारांना मतदान केलं आणि त्यांनी विधानसभेला माझ्यासह इतर उमेदवारांना मतदान केलं. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बारामतीमधून शरद पवारांना ८५,००० मतांचं लीड (मताधिक्य) मिळालं होतं. तर, मला केवळ ३५ ते ४० हजार मतांचं लीड मिळालं होतं. तेव्हा मी मतदारांवर, लोकशाही प्रणालीवर, निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले नाहीत. आता हे पराभूत उमेदवार सांगतात की ईव्हीएममध्ये घोटाळा झाला आहे. मी म्हणतो की त्यांनी पुरावे दाखवावे”.