kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी ! एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आले आहेत. सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता गावी आल्यानंतर शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या दरे येथील बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल झाली आहे. त्यांना ताप आल्याचे समजत आहे. त्यांना सध्या सलाईन लावल्याचे ही सूत्रांकडून समजत आहे.

प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ शिंदे आज बाहेर पडले नाहीत. त्यांनी घरीच आराम करणे पसंत केले. ऐन राजकीय घडामोडींच्या काळातच शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता मुख्यमंत्रीपदाचा मान कोणाला मिळणार यावरून स्पर्धा सुरू आहे. अशावेळी शिंदेंची प्रकृती खराब झाली आहे. त्यामुळे उलट सुलट चर्चांना राजकीय वर्तूळात उधाण आले आहे.

मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याची कधीही घोषणा होवू शकते. शपथविधी सोहळ्याची वेळ जवळ येते आहे. तेव्हाच नाराज एकनाथ शिंदेंनी थेट गाव गाठलं आहे. ऐन अमावस्येला एकनाथ शिंदे गावी गेल्याने एक वेगळीच चर्चाही होत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे नाराज होऊन आपल्या गावाला निघून गेले; त्यांच्या गावात अशी कोणती देवी आहे? असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे गटाचे नेते माजी मंत्री दीपक केसरकर हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला त्यांच्या दरे या गावी आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने केसरकर यांना बंगल्याच्या गेटवरूनच माघारी परतावे लागले. त्यानंतर दिपक केसरकर यांना मुंबईला परत येण्या शिवाय पर्याय राहीला नाही. त्यामुळे शिंदेंना नक्की काय झालं आहे याची विचारणा सगळीकडे केली जात आहे.