Breaking News

‘मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येतं’ मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभा गाजवली

मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येते. ते मी भेदलं आणि इथं आलो अशी चौफेर टोलेबाजी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा गाजवली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलत होते. यावेळी बोलताना विधानसभा निवडणुकी वेळी विरोधकांनी कसे चक्रव्यूह रचले होते. ते आपण भेदले. शिवाय निकालानंतरही ईव्हीएम विरोधात विरोधकांनी कशी ओरड केली. त्याला चोख प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिले. शिवाय विरोधकांच्या फेक नरेटिव्हला उद्धवस्त करायला मी आलो आहे असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है हा नारा दिला. त्याला महाराष्ट्राने प्रतिसाद दिला. त्यामुळेच मोठा विजय मिळाला असं ते म्हणाले. गेली पाच वर्ष महाराष्ट्रासाठी संक्रमणाची होती. आरोप प्रत्यारोप करण्यात आले. असा अनुभव कुणीच घेतला नाही. व्यक्तीगत मला आणि माझ्या कुटुंबाला टार्गेट करण्यात आलं. त्यामुळेच मला महाराष्ट्राच्या जनतेची सहानुभूती मिळाली. आम्ही घेतलेली मेहनत आणि लाडक्या बहिणींच्या आशिर्वादाने आम्ही परत आलो असंही ते विधानसभेत म्हणाले.

त्यानंतर फडणवीसांनी आपला मोर्चा विरोधकांच्या ईव्हीएम वरिल आक्षेपाकडे वळवला. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. जनतेने आम्हाला जनादेश दिला. अशा वेळी 74 लाख अतिरिक्त मतं कुठून आली असा प्रश्न विरोधकांनी विचारला. विरोधकांनी फेक नरेटिव्ह फॅक्टरी सुरू केली. पण विधानसभेला 9 कोटी मतदार होते. त्या पैकी 6 कोटी 10 मतदारांनी मतदान केले. म्हणजे 66 टक्के मतदान झाले. शेवटच्या टप्प्यात जास्त मतदान कसे झाले असा आरोप विरोधक करत होते. पण शेवटच्या टप्प्यात 17 लाख मतदान झाल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले. त्यामुळे विरोधकांना 74 लाख मतं वाढल्याचा आरोप हा चुकीचा असल्याचंही ते म्हणाले. लोकांना महायुतीसाठी मतदान केलं असंही ते म्हणाले. त्यामुळे हा जनादेश विरोधकांनी स्विकारला पाहिजे असंही ते म्हणाले.

यावेळी फडणवीसांनी शरद पवारांना आवर्जुन उल्लेख केला. काँग्रेस ईव्हीएम बाबत नेहमी ओरड करत आहे. पण शरद पवारांनी कधीही ईव्हीएम बाबत आक्षेप घेतला नव्हता. विजय झाला काय पराभव झाला काय त्यांनी ईव्हीएमला दोष दिला नव्हता.पण मारकडवाडीवरून पवारांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याबाबत आश्चर्य वाटले. ज्या मारकडवाडीत बॅलेटवर मतदानाची मागणी केली जात होती तिथे या आधीच्या निवडणुकीतही काँग्रेसला जास्त मतं मिळाली नव्हती ही आकडेवारी फडणवीसांनी दाखवून दिली. शिवाय निकालानंतर गावात दमदाटी करून बॅलेटवर मतदान करण्याचे ठरवले होते असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. दादागिरी या लोकशाहीमध्ये चालू देणार नाही असंही ते म्हणाले.

दरम्यान ईव्हीएमवर आक्षेप घेण्यावर आता बंद करा. सर्वोच्च न्यायालयानेही हे प्रकरण निकाली काढले आहे. ईव्हीएमबाबतच्या याचिका निकाली काढल्या आहेत. आता ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅटही मोजले जाते असंही ते म्हणाले. त्यामुळे निकाल आपल्या बाजूने लागला तर लोकशाही जिवंत आहे. निकाल विरोधात गेला की लोकशाहीची हत्या हे बोलणे आता विरोधकांनी थांबवले पाहीजे असंही ते म्हणाले. विरोधकांची ही कृती म्हणजे संविधानावर दाखवलेला अविश्वासच म्हणावा लागेल असंही ते म्हणाले. 2004 साली पहिल्यांदा ईव्हीएमवर मतदान झाले. त्यावेळी वाजपेयींचे सरकार गेले काँग्रेसचे सरकार आहे.2009 साली तेच झाले. पण 2014 साली मोदी आले आणि ईव्हीएम वाईट झालं असा टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *