विजया दशमीनिमित्त पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पॉडकास्टवरून संवाद साधला आहे. “दसऱ्याच्या निमित्ताने दोन शब्द बोलावेसे वाटले म्हणून मी बोलतोय… पण खरं तरी ही निवडणूक या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदारांनी क्रांती केली पाहिजे. आजपर्यंत तुम्ही जे करत आले आहात, ज्या लोकांना तुम्ही जोपासलं, सांभाळलं ते लोकं आज तुमच्या मतांशी प्रतारणा करत आलेत. तुम्हाला अत्यंत गृहित धरलं गेलं आणि दरवेळेला हे गृहित धरणं आहे हेच महाराष्ट्राचं नुकसान करत आलं आहे… “असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सरकार आणि राजकारणावर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे यांनी विजया दशमीनिमित्त पहिल्यांदाच पॉडकास्टवरून संवाद साधताना राज्यातील राजकारणावर आणि राजकारण्यांवर टीका करत तरुणांना विनंती केली आणि म्हणाले, ‘माझ्या महाराष्ट्रातील तरुणांनी, तरुणींना, शेतकऱ्यांनी, सगळ्यांनाच माझी हात जोडून विनंती आहे. दसऱ्यानंतर येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत तेव्हा बेसावध राहू नका.शमीच्या झाडावरची शस्त्र आता उतरवा. ही आता क्रांतीची वेळ आहे. ही वचपा घेण्याची वेळ आहे. आताच ती शस्त्र उतरवून तुम्हाला सर्वांचा वेध घ्यावा लागेल.’

‘गेली अनेक वर्ष… खास करून गेली पाच वर्ष तुमच्या मतांशी ज्यांनी प्रतारणा केली, ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला, ज्यांनी तुम्हाला गृहित धरलं… वेड्या वाकड्या युत्या, वेड्या वाकड्या आघाड्या करत बसले…. आज सगळीजणं बोलतील त्यांच्या मेळाव्यांमध्ये. एकमेकांची उणी-धुणी काढतील पण त्यात तुम्ही कुठे असणार?’ असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

‘मी एक महाराष्ट्राचं स्वप्न पाहतोय गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहे. ही साकारण्याची संधी मला माझ्या सहकाऱ्यांना मिळूदे. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा हेच माझं स्वप्न आहे….’ असं म्हणत राज ठाकरे यांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *