नवी मुंबई पोलिसांच्या अंतर्गत ‘नशामुक्त नवी मुंबई अभियाना’चा प्रारंभ आज पार पडला. या कार्यक्रमात अनेक अभिनेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंमली पदार्थांवर भाष्य केलं. आपल्याला महाराष्ट्र आणि भारत हा ड्रग्समुक्त करावा लागणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना स्वत:बद्दलही भाष्य केलं. ते म्हणाले की, “मी आयुष्यात कधीच अंमली पदार्थाला स्पर्श केला नाही, मला कुणाची कधी काही म्हणण्याची हिंमतही झाली नाही. आता तर नाहीच नाही, पण कॉलेजमध्ये असतानाही नाही”, असं फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्तात एक बलशाली भारत आपण पाहत आहोत. भारताकडे वाकडी नजर करून बघण्याची हिंमत कोणी करत नाही. आपली प्रगती पाहून आपल्या देशावर थेट वार करता येत नाही. या देशाशी सरळ लढाई करता येत नाही. या देशात दहशतवाद माजवला तर हा देश आता सहन करत नाही तर घूसून मारतो ही परिस्थिती लक्षात आल्यानतंर देशातल्या तरुणाईला व्यसनाधीन कसं करता येईल? या देशाला आतून कसं पोखरता येईल? या देशाचं भवितव्य युवा अवस्थेतच कशा प्रकारे संपवता येईल अशा प्रकरचा एक डाव या देशात सुरु झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचा प्रादुर्भाव आपल्याला देशात पाहायला मिळाला. पंजाब सारखं राज्य ज्या प्रकारे ड्रग्सने पोखरलं, अशा प्रकारे सीमावर्ती राज्यातील युवा शक्ती ड्रग्सच्या आहारी गेली आणि कुठल्याही प्रकारे मुकाबला करण्याची ताकद त्यांच्यामध्ये राहणार नाही तर देशाच्या सीमेचे रक्षण कसं होईल? म्हणून हळू हळू ड्रग्सचा विळखा आपल्या देशाच्या भोवती विणण्याचं काम सुरु झालं”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
“मला एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील सर्व गृहमंत्र्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले की कॅनडा सारखा देश ड्रग्सची लढाई हारला. आता ते ड्रग्सला लीगल का करत आहेत? तर त्यांना माहिती आहे की परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. किती लोकांना जेलमध्ये टाकायचं? अशी अवस्था त्यांची झाली आहे. मात्र, आज भारत हा अशा अवस्थेत आहे की आपण ही लढाई जिंकू शकतो. त्यामुळे देशातील सर्व राज्यांनीही एकमेकांना सहकार्य करत ही लढाई लढली पाहिजे. आज आपण सुरुवात ड्रग्समुक्त नवी मुंबईपासून करत आहोत. आपल्याला महाराष्ट्र आणि भारत हा ड्रग्समुक्त करावा लागणार आहे. यासाठी केंद्र सरकारने एक मोठी व्यवस्था उभी केली. प्रत्येक जिल्ह्यात यासंदर्भातील समित्या तयार केल्या आहेत. त्या माध्यमातून सर्व विभागांचा समन्वय करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“आज आपल्या नव्या पिढीमध्ये ड्रग्स घेणे म्हणजे कूल आहे, अशी आजच्या नव्या पिढीची भावना असते. ड्रग्स घेणे म्हणजे अजिबात कूल नाहीये. नशा करणं, वेगवेगळ्या सवयी लावून घेणं हे अजिबात चांगलं नाहीये. यामधून तुम्हाला दोन-चार दिवस आनंद मिळेल. पण त्यामुळे जीवन बरबाद होतं. ते परत येणं फार कठीण जातं. एक व्यक्ती त्याच्या कुटुंबाचंही जीवन बरबाद करतो. हे समाजाचं आणि राज्याचं जीवन बरबाद करतात. त्यामुळे आपल्याल कुठेतरी नाही म्हणताच आलं पाहिजे. माझ्या जीवनात मी कधीही अंमली पदार्थाला स्पर्श केला नाही. कधी कोणाची म्हणण्याची हिंमत झाली नाही, म्हणजे आता तर शक्यच नाही. पण कॉलेजमध्ये असतानाही मला अशी सवय लावायची कोणाची हिंमत झाली नाही. याचं कारण आपला निर्धार असला पाहिजे. ही ताकद आपली आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.