जम्मू-काश्मीरच्या अखनूर भागात मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. नियंत्रण रेषेजवळील अखनूर सेक्टरमध्ये झालेल्या आयईडी स्फोटात तीन जवान जखमी झाले होते. त्यापैकी दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. या हल्ल्यात एक कॅप्टन आणि एक जवान शहीद झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवरील फेंस पेट्रोलवर तैनात असताना हा हल्ला झाला. लष्कराने सांगितले की, या भागात शोधमोहीम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूच्या खौर पोलीस ठाण्याअंतर्गत केरी बट्टल भागात दुपारी साडे तीनच्या सुमारास हा हल्ला झाला. नियंत्रण रेषेवर गस्त घालणाऱ्या तीन जवान आयईडी स्फोटात जखमी झाले. यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अन्य एका जवानावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माहिती मिळताच लष्कर तेथे पोहोचले आणि शोधमोहीम सुरू केली. नगरोटा येथील व्हाईट नाईट कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. लष्कराने लिहिले आहे की, व्हाईट नाईट कॉर्प्स दोन शूर जवानांच्या सर्वोच्च बलिदानाला सलाम आणि श्रद्धांजली अर्पण करते.
याआधी सोमवारी व्हाईट नाईट कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग आणि लेफ्टनंट जनरल नवीन सचदेवा यांनी राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील दहशतवादी कारवायांचा आढावा घेतला. राजौरी जिल्ह्यातील केरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची माहिती लष्कराने दोन दिवसांपूर्वी दिली होती. नियंत्रण रेषेवरील लाँच पॅडमध्ये जवळपास १०० दहशतवादी लपून बसल्याची भीती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. दहशतवादी हल्ले करण्यासाठी त्यांना भारतीय हद्दीत घुसता यावे यासाठी पाकिस्तानने या दहशतवाद्यांना नियंत्रण रेषेजवळील वेगवेगळ्या लाँच पॅडवर पाठवले आहे.
पाकिस्तानी दहशतवादी या भागात सातत्याने आयईडी हल्ल्यांची योजना आखत असतात. यापूर्वी नियंत्रण रेषेवर असे अनेक आयईडी स्फोट झाले आहेत. उत्तर लष्कराचे माजी कमांडर लेफ्टनंट जनरल के. टी. परनायक यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. नोव्हेंबर २००९ मध्ये सांबा जिल्ह्यातील रामगड सेक्टरमध्ये झालेल्या भूसुरुंग स्फोटात बीएसएफचे डीआयजी ओपी तंवर शहीद झाले होते.