केशवराव हे एखाद्या तेजस्वी ताऱ्या प्रमाणे रंगभूमीवर लखलख चमकणारे स्वयंप्रकाशीत सूर्य होते. या चारित्र्य संपन्न कलाकारांची कारकीर्द संघर्षमय होती. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. कोणतेही शिक्षण आणि संगीताची परंपरा नसताना केशवरावांनी आयुष्यभर रंगभूमीची सेवा केली. केवळ कलाकारच नव्हे तर राष्ट्रप्रेमी, समाजकारणी, दानशूर व व्यक्तशीर असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. केशवराव आणखी काही वर्ष जगले असते, तर रंगभूमीचा इतिहासच बदलला असता, असे मत केशवराव भोसले यांचे पणतू अशोक पाटील यांनी व्यक्त केले.

संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या १०३ व्या स्मृतिदिनानिमित्त मराठा सेवा संघ प्रणित,संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद, पुणे व अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संगीतसूर्याला मानाचा मुजरा’ या अभिवादन व त्यांच्या संगीत नाट्य कलेला लोककलावंतांच्या कलेतून उजाळा देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वर्षा धाबे (प्रदेशाध्यक्ष, संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद महाराष्ट्र),मेघराज राजेभोसले (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ), अजित शिरोळे (कार्याध्यक्ष, संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद महाराष्ट्र),मैथिली कलामंदिर चे मिलिंद माळी,उषा पाटील आदी उपस्थित होते.

अशोक पाटील म्हणाले, केशवरावांवर अनेक दिग्गज लेखकांनी लेखन केले आहे. मात्र ते एक रंगभूमीवरील कलाकार म्हणून किंवा संगीत कलावंत म्हणून केले आहे. मात्र, त्यांच्या जीवनपटाकडे पाहिले असता त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे अष्टपैलू आहे, याची कल्पना येते. अशा या गुणी कलाकाराचा वैभवाच्या शिखरावर असताना अकाली मृत्यू होणे, हे दुर्दैवी आहे. वयाच्या केवळ 31 व्या वर्षी आजच्या दिवशीच (4 ऑक्टोबर)  त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांची अंत्ययात्रा एखाद्या राजासारखी निघाली होती. आता उरल्यात फक्त आठवणी. ते देहाने गेले असले तरी अमर आहेत. त्यांच्या कर्तृत्वाला माझा मानाचा मुजरा.

वर्षा धाबे यांनी देखील केशवरावांच्या स्मृतींना उजाळा दिला.तर शिवमती प्रमिलाताई भिसे, वंदना मोरे,निनाद जाधव,प्राध्यापक देवेंद्र देशमुख अकोला यांनी नाट्यगीत सादर केले.तसेच विजय गायकवाड यांनी लोकसंगीतातून मानवंदना दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अजित शिरोळे म्हणाले, मागीलवर्षी पासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यासाठी मेघराज राजेभोसले मराठी नाट्य परिषद पुणे,मैथिली कलामंदिर चे मिलिंद माळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *