Breaking News

तुम्हाला गाड्या फोडायच्या असतील तर चार माणसांची नावे देतो, त्यांच्या गाड्या फोडा – प्रकाश आंबेडकर

गेल्या दोन दिवसांत दोन नेत्यांच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमुळे गाड्या फोडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांवर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मिश्किल शैलीत भाष्य केलं आहे. त्यांनी गाड्यांची तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातील 4 मोठे आणि ताकदवान नेत्यांच्या गाड्या फोडण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी थेट 4 नेत्यांची नावेदेखील घेतली आहेत. “आता मिटकरी कुठल्या पक्षात आहेत? अजित पवार गटात आहे. जितेंद्र आव्हाड कोणत्या गटात आहेत? शरद पवार गटात आहेत. गाड्या फोडणाऱ्यांना माझं आवाहन आहे, अरे चिल्लर लोकांच्या का गाड्या फोडत आहात? या चिल्लर लोकांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही. तुम्हाला गाड्या फोडायच्या असतील तर चार माणसांची नावे देतो, त्यांच्या गाड्या फोडा. एक माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, दुसरं नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तिसरं नाव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि चौथं नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, या नेत्यांच्या गाड्या फोडा. या चिल्लरफाल्लरांच्या काय गाड्या फोडता?”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत दोन नेत्यांच्या गाड्या फोडल्याच्या घटना घडल्या. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीची तोडफोड केली. या घटनेमुळे महाराष्ट्रातील वातावरण तापलं होतं. जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा राग मनात धरुन संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांनी काल जितेंद्र आव्हाड यांची गाडी फोडली.

जितेंद्र आव्हाड यांची गाडी फोडण्याआधी तशीच घटना एक दिवस आधी अकोल्यात घडली होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी गाडी फोडली होती. अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना सुपारीबाज असं वक्तव्य केलं होतं. त्यांची ही टीका मनसे कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी संतापात अमोल मिटकरी यांची अकोल्यात गाडीची तोडफोड केली होती.