Breaking News

भारत आत्मविश्वासाने भरलेला, 2024 मध्येही तोच उत्साह आणि वेग ठेवायचाय – पंतप्रधान

आज भारताचा प्रत्येक कोपरा न कोपरा आत्मविश्‍वासाने भरलेला आहे. विकसित भारताच्या भावनेने-आत्मनिर्भरतेच्या भावनेने काठोकाठ भरलेला आहे. 2024 मध्येही आपल्याला तोच उत्साह आणि तोच वेग कायम ठेवायचा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते मन की बात कार्यक्रमात बोलत होते.

140 कोटी भारतीयांच्या बळाच्या जोरावर या वर्षात (2023) आपल्या देशाने अनेक विशेष कामगिऱ्या बजावल्या आहेत. अनेकांनी पत्रे लिहून, भारत 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आज भारताचा प्रत्येक कोपरा न कोपरा आत्मविश्‍वासाने भरलेला आहे. विकसित भारताच्या भावनेने-आत्मनिर्भरतेच्या भावनेने काठोकाठ भरलेला आहे. 2024 मध्येही आपल्याला तोच उत्साह आणि तोच वेग कायम ठेवायचा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते मन की बात कार्यक्रमात बोलत होते.

भारताच्या प्रयत्नांमुळे 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप्सना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. दिवाळीतील विक्रमी व्यवसायाने सिद्ध केलेच आहे की ,प्रत्येक भारतीय ‘व्होकल फॉर लोकल’ – ‘स्थानिक उत्पादनांसाठी आग्रह’ या मंत्राला महत्त्व देत आहे, असेही यावेळी पंतप्रधान म्हणाले. अनेक खेळांमध्ये खेळाडूंनी केलेल्या उत्तम कामगिरीने देशाचे नाव मोठे केले आहे. आता 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक होणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण देश आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे त्यांचे मनोधैर्य वाढवत आहे. नाटू-नाटू गाण्याला ऑस्कर , ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला मिळालेल्या सन्मानाबद्दल कळल्यानंतर संपूर्ण देश आनंदाने मोहरून उठला. या माध्यमातून जगाने भारताची सर्जनशीलता पाहिली आणि त्यांना पर्यावरणाशी आपले नाते-जिव्हाळा समजला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान, बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद यांनी ‘बुद्धिबळ’ या खेळासाठी मानसिक तंदुरुस्ती किती महत्त्वाची आहे, याबद्दल देखील ‘मन की बात’मध्ये आपले विचार मांडले.

जो देश नवोन्मेषाला महत्त्व देत नाही त्या देशाचा विकास थांबतो. भारत नवोन्मेषाचे मोठे केंद्र बनणे याचेच प्रतीक आहे-हेच दाखवते की आपण आता थांबणार नाही, असा विश्वास मोदींनी मन की बात कार्यक्रमात व्यक्त केला.

ग्लोबल इनोव्हेशन रँकमध्ये सुधारणा –

मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत इनोव्हेशन हब होतोय, हे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे की आपण थांबणार नाही. 2015 मध्ये आपण ग्लोबल इनोव्हेशन रँकमध्ये 81 व्या क्रमांकावर होतो, आज आपला क्रमांक 40 वा आहे. या वर्षी भारतात दाखल केलेल्या पेटंटची संख्या जास्त आहे, त्यापैकी सुमारे 60% हे देशांतर्गत निधीचे होते. यावेळी क्यूएस एशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये सर्वाधिक भारतीय विद्यापीठांचा समावेश झाला आहे.