महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता जोरात सुरु झाला आहे. या निवडणुकीत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील नेहमी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत आहे. आता त्यांना भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न विचारला आहे. ‘मनोजदादा जरांगे, आमचं चुकलं काय ? खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणा…’, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
सांगलीत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मनोज दादा जरांगे, आमचे चुकले काय ? हा आमचा तुम्हाला सवाल आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण दिलं हे चुकलं का? त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना ते आरक्षण गेले, त्यात आमचे काही चुकलं का ? पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या काळात आम्ही मराठा दिले हे आमचं चुकलं का? असा सवाल त्यांनी मनोज जरांगे यांना विचारला आहे.
मनोज जरांगे जर आम्हाला समजून घेत नसतील तर सामान्य मराठा समजून घेईल, असा सूचक इशारा त्यांनी मनोज जरांगे यांना दिला. जो लोकसभेला फटका मराठवाड्यात बसला तो विधानसभेला बसणार नाही, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, माझी मनोज जरांगे पाटलांना हात जोडून विनंती आहे, मराठा आरक्षणसाठी खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हटलं पाहिजे.