kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

महाराष्ट्राचा महासिनेमा ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या महानायकाच्या गाथेचा भव्य ट्रेलर प्रदर्शित !

संदीप रघुनाथ मोहिते-पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित बहुचर्चित, महाराष्ट्राचा महासिनेमा ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला.

या सोहळ्याचा शुभारंभ चित्रपटातील ‘राजं संभाजी’ या गाण्याच्या नृत्याने झाला. मावळ्यांच्या या उत्स्फूर्त सादरीकरणाने एक चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. हा भव्य चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्याचा आणि त्यागाचा सन्मान करणारा आहे. हा चित्रपट म्हणजे महाराष्ट्राचा महासिनेमा आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांना भव्यदिव्य स्वरूपात मांडण्यात आले आहे. त्यांच्या शौर्यपूर्ण नेतृत्वाने हिंदवी स्वराज्याचे संरक्षण केले, तसेच धर्माच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचे अत्यंत प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांची ही शौर्यगाथा या चित्रपटात अनुभवयाला मिळणार आहे.

या चित्रपटात ठाकूर अनुप सिंग, अमृता खानविलकर, किशोरी शहाणे, भार्गवी चिरमुले, मल्हार मोहिते-पाटील, संजय खापरे, पल्लवी वैद्य, कमलेश सावंत, विनीत शर्मा, प्रदीप रावत, प्रदीप कब्रा, राज जुत्शी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळतील. ट्रेलर पाहाता या सर्व कलाकारांनी भूमिकांना सर्वोत्तम न्याय दिला आहे.

चित्रपटाचे निर्माते संदीप रघुनाथ मोहिते-पाटील म्हणतात, ”छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनप्रवास म्हणजे धैर्य, त्याग आणि निष्ठेचा एक महान अध्याय आहे. या ट्रेलरच्या माध्यमातून आम्ही त्यांची कहाणी नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांचे कार्य आणि त्याग आजही तितकेच प्रेरणादायी आहे, आणि मला खात्री आहे की, हा चित्रपट प्रत्येकाला त्यांच्या कर्तृत्वाची आठवण करून देईल.”

चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार विजयराव शेलार म्हणतात, “संभाजी महाराजांचे जीवन म्हणजे प्रेरणादायी पराक्रमाची गाथा. ट्रेलरमध्ये आम्ही त्यांच्या संघर्षाच्या आणि वीरतेच्या काही महत्त्वाच्या क्षणांना उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना त्यांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्याचा अनुभव घेता येईल. मला विश्वास आहे की, हा ट्रेलर प्रेक्षकांना महाराजांच्या अद्वितीय धैर्याची झलक दाखवेल.”

संदीप रघुनाथ मोहिते-पाटील प्रस्तुत, आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची निर्मिती शेखर रघुनाथराव मोहिते-पाटील, धर्मेंद्र सुभाष बोरा, सौजन्य सूर्यकांत निकम आणि केतनराजे निलेशराव भोसले यांनी केली आहे. ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा चित्रपट येत्या २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.