मंडई मेट्रो स्टेशन येथे मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. मेट्रो स्टेशनच्या तळमजल्यावर फोमच्या साहित्याला आग लागून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. अग्निशमन दलाकडून तातडीनं 5 वाहने रवाना करीत पाचच मिनिटात आग आटोक्यात आणली. जवानांनी श्वसनरहित अग्निशमन उपकरणाचा वापर करत पाणी मारुन आग विझविली. वेल्डिंगचे काम सुरू असताना आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे

मुरलीधर मोहोळ यांनी केली एक्स पोस्ट

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत मंडई मेट्रो स्टेशनला आग झाल्याची माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, ” मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा दुर्दैवी प्रकार काही वेळापूर्वी घडला होता. आगीची माहिती समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. ही घटना मेट्रोचे प्रवासी कामकाज संपल्यानंतर घडली होती. मेट्रो स्टेशनच्या भागात वेल्डिंगची काम सुरू असताना हा प्रकार घडला. यासंदर्भात मेट्रोचे कार्यकारी संचालक श्रवण हर्डीकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मेट्रो प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.”

पोलिसांनी काय सांगितले? याबाबत पोलीस उपायुक्त संदीप गिल म्हणाले, ” तळमजल्यावर वेल्डिंगचे काम सुरू असताना फोमच्या साहित्याला आग लागली. यावेळी मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. आग मोठ्या प्रमाणावर नव्हती. पण धूर मोठ्या प्रमाणावर निघत होता. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यात आली आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *