शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कारवर शेण फेकलं, बांगड्या फेकल्या, नारळ फेकून ताफ्यातील गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. उद्धव ठाकरेंचा काल ठाण्यातील रंगतनमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यापूर्वी या सभास्थळी मनसैनिक घुसले. मनसैनिकांकडून सभास्थळी गोंधळ घालण्यात आला. पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड सुरु केली. मनसे पदाधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या वाहनाखाली टायर जवळ सुपारी ठेवण्यात आल्या. त्यांच्या गाडीवर बांगड्या, टोमॅटो, शेण फेकण्यात आलं, यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या. या घटनेचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत.

संदीप देशपांडे यांची या घटनेवर प्रतिक्रिया काय?

या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर नारळ फेकून गाडीच्या काचा फोडल्याचे कृत्याचे समर्थन केले. एखादी गोष्ट सुरुवात करताना विचार करायचा असतो, पुढे त्याचा काय परिणाम होऊ शकतात. दुसऱ्याने काही केल्यानंतर मग शहाणपणा शिकवायला जायचे नसते, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला निर्वाणीचा इशारा दिला. तुम्ही शिवसैनिक असाल तर आम्ही मनसैनिक आहोत. तुमच्याकडे बाळासाहेबांचे विचार असतील तर आमच्याकडेही बाळासाहेबांचे विचार आहेत. तुम्ही आरे केले तर आम्ही कारे करणारच, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले. मराठवाड्यात जे झालं ते आणि काल जो प्रकार घडला तो अख्ख्या महाराष्ट्राने बघितला. हे कोणालाही आवडलेलं नाही. आपणही काचेच्या घरात राहतो. आपणही दौऱ्यावर जातो, सभा घेतो, याचं भान प्रत्येकाला असले पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने असंच करायचं ठरवलं तर महाराष्ट्रात काय होईल, याचा विचार प्रत्येकाने करावा, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

कालची घटना ही क्रियेला प्रतिक्रिया होती. त्यामुळे प्रतिक्रिया मिळाल्यानंतर सारवासारव करु नये. मराठा आंदोलकांच्या आडून राजसाहेबांवर हल्ला करण्यात आला. पुन्हा तिकडून काही क्रिया झाली तर आम्ही प्रतिक्रिया देणारच. शिवसैनिकांनी किरीट सोमय्या आणि नवनीत राणा यांच्या गाडीवर हल्ला केला तेव्हा ही संस्कृती कुठे गेली होती, असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.

संजय राऊत यांची या घटनेवर प्रतिक्रिया काय?

दिल्लीतील अहमदशाह अब्दाली याच्या सुपाऱ्या घेतलेल्या लोकांनी काल ठाण्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती होती. त्यांनी डरपोकांप्रमाणे काळोखात लपून नारळ आणि शेण फेकलं. नशीब त्यांचं काल ते आमच्यासमोर आले नाहीत. अन्यथा त्यांना शिवसैनिक आणि महाराष्ट्र काय आहे, ते दाखवून दिले असते, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी ठाण्यातील मनसेच्या रिअॅक्शनला प्रत्युत्तर दिले आहे.

काही दिवसांपुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींची गाडी फोडली होती. त्यानंतर राज ठाकरेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला आणि आता काल (शनिवारी) उद्धव ठाकरेंच्या कारवर शेण फेकलं, बांगड्या फेकल्या, नारळ फेकून ताफ्यातील गाड्यांच्या काचा फोडल्या, थेट उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याच्या ठिकाणी घुसून मनसैनिकांनी गोंधळ घातला. ठाण्यात एवढा राडा झाला असतानाही उद्धव ठाकरे असो वा संजय राऊत, यांनी आपल्या भाषणात राज ठाकरेंचा कोणताही उल्लेख केला नाही. दरम्यान याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत.