kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मुंबई पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरली ; आणखी एका राजकीय व्यक्तीची हत्या

मुंबई पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबईत आणखी एका राजकीय व्यक्तीची हत्या झाली आहे. मुंबईतील मालाड पूर्वेमध्ये मनसे कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी मालाड पूर्वे येथे रेल्वे स्टेशनजवळ घडली आहे. आकाश माईन (वय २७ वर्ष) असं हत्या करण्यात आलेल्या मनसे कार्यकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

मालाड पूर्व येथे दिंडोशी परिसरात मनसे कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. रिक्षा चालक आणि स्थानिक फेरीवाल्यांकडून त्याची हत्या झाल्याचं सांगितलं जात आहे. आकाश माईन काल विजयादशमी दसरानिमित्त शनिवारी सायंकाळी नवीन गाडी खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी कट मारल्यामुळे रेल्वे स्टेशनजवळ त्याची एका रिक्षावाल्यासोबत बाचाबाची झाली.

वाद वाढल्यानंतर रिक्षा चालकाचे मित्र आणि स्थानिक फेरीवाल्यांनी घटनास्थळी जमून सुमारे १० ते १५ जणांनी मनसे कार्यकर्ता आकाशवर हल्ला केला. लाथा-बुक्क्यांनी केलेल्या मारहाणात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आकाश माईनचा मृत्यू झाला. या हल्ला प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.