राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास वांद्रे पश्चिम येथे झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसच्या बाहेर ही घटना घडली. गोळीबारानंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे १५ दिवसांपूर्वी त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. SRA प्रकल्पातून हा गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी सिग्नलनजीक आमदार झिशान सिद्दीकी यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाहेर तिघांनी बाबा सिद्दिकींवर ६ राऊंड गोळ्या झाडल्या, त्यापैकी एक गोळी त्यांच्या छातीला लागली होती. या घटनेनंतर त्यांना तातडीने जवळच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी दाखल करण्यापूर्वीच डॅाक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले. तीन गोळ्या लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. या घटनेचे वृत्त कळताच त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल माहिती दिली असून बाबा सिद्दिकींवर तिघांनी गोळीबार केला असून त्यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. एक जण हरियाणा तर दुसरा उत्तर प्रदेशमधील आहे. तिसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लिलावती रुग्णालयात आले.