kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल ‘प्रचंड’ यांनी संसदेतील बहुमत चाचणीमध्ये पराभव झाल्यानंतर दिला पदाचा राजीनामा

भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल ‘प्रचंड’ यांनी संसदेतील बहुमत चाचणीमध्ये पराभव झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. १९ महिने नेपाळच्या सत्तेवर असलेल्या प्रचंड यांच्या सरकारला दिलेला पाठिंबा माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन-यूएमएल आघाडीने काढून घेतला होता. त्यामुळे प्रचंड यांना सभागृहात विश्वासमताला सामोरे जावे लागले. त्यात प्रचंड यांचा पराभव झाला. दरम्यान, कम्युनिस्ट पार्टीचे के. पी. शर्मा ओली हे नवे पंतप्रधान असतील, यावर विरोधी पक्षांच्या आघाडीचं एकमत झालं आहे.

प्रचंड यांनी २५ डिसेंबर २०२२ रोजी नेपाळच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र तेव्हापासून आतापर्यंत ५ वेळा विश्वासमताचा सामना करावा लागला होता. दरम्यान, आज झालेल्या विश्वासदर्शक ठरावामध्ये विजय मिळवण्यासाठी प्रचंड यांच्या पक्षाला प्रतिनिधी सभेतील २७५ सदस्यांपैकी किमान १३८ सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता होता. मात्र एवढा पाठिंबा मिळवण्यात प्रचंड हे अपयशी ठरले. त्यामुळे त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला.

सध्या नेपाळ काँग्रेसजवळ सभागृहात ८९ सदस्य आहेत. तर सीपीएन-यूएमएलजवळ ७८ सदस्य आहेत. दोघांची बेरीज १६७ होते. ती बहुमताच्याआकड्यापेक्षा अधिक आहे. तर प्रचंड यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओवादी सेंटर) कडे ३२ सदस्य आहेत. दरम्यान नेपाळ काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबा यांनी आधीच के. पी. शर्मा ओली यांना पाठिंबा दिला आहे.