कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाने जल्लोष सुरु केला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे नितेश राणे विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे संदेश पारकर असा सामना आहे. सध्या 8 फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे. नितेश राणे हे 20 हजारपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. कणकवलीत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. नितेश राणेंच्या कपाळाला गुलाल लागला आहे. “मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून बोलत होतो, कणकवली, देवगड वैभववाडीच्या जनेतेने मला तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी द्यायची हे ठरवलेलं. 262 गावात फिरताना मला ते जाणवलं” असं नितेश राणे म्हणाले.
“वेगवेगळ्या गावात फिरताना लोक मला सांगायचे, नितेश राणे तुम्ही चिंता करु नका. तुम्ही राज्यात केलेलं हिंदुत्वाच काम आम्हाला पसंत आहे. आमचे देवेंद्रजी म्हणालेले, हे एक धर्मयुद्ध होतं. माझ्या मतदारसंघात माझ्या विरुद्ध जिहादींच्या माध्यमातून विषारी प्रचार केला. पण माझ्या मतदारसंघातील हिंदू समाज कडवटपणे माझ्यासोबत राहिला” असं नितेश राणे म्हणाले.
“हा 100 टक्के हिंदुत्ववादी विचारांचा मतदारसंघ आहे. देवेंद्रजी म्हणाले होते, हे धर्म युद्ध आहे. ही भगवा विरुद्ध फतवा लढाई होती. महाराष्ट्रात आणि कणकवलीत भगवा जिंकला आहे” असं नितेश राणे म्हणाले. नितेश राणेंकडे 8 व्या फेरी अखेर 20 हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी आहे. ’24 व्या फेरीअखेर लीड 60 हजारपेक्षा कमी होणार नाही’ असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केला. “सिंधुदुर्ग जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी तिन्ही जागा आम्ही जिंकणार” असं नितेश राणे म्हणाले. “महाराष्ट्रात महायुती जिंकली, भगवाधाऱ्यांच राज्य आलं. आता कानाकोपऱ्यात अल्लाहू अकबर नाही, जय श्रीराम ऐकायला मिळणार” असं नितेश राणे म्हणाले.