बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा आवामी लीगचं सरकार येणार आहे आणि शेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार आहेत. भारताच्या शेजारी देशात रविवारी (७ डिसेंबर) सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आवामी लीगने ३०० पैकी दोन तृतीयांश जागा जिंकल्या आहेत. शेख हसीना २००९ मध्ये पहिल्यांदा बांगलादेशच्या पतंप्रधान झाल्या होत्या. तेव्हापासून शेख हसीना याच बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत. यापूर्वी १९९१ ते १९९६ अशी पाच वर्षे शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. बांगलादेशमधील ३०० पैकी २९९ जागांवर रविवारी निवडणूक पार पडली. यापैकी २१६ जागा आवामी लीगने जिंकल्या आहेत.

बांगलादेशमध्ये रात्री उशिरापर्यंत मतमोजणी चालू होती. सोमवारी (८ डिसेंबर) पहाटे हाती आलेल्या निकालानुसार बांगलादेश जातीय पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत. तर ६२ जागांवर अपक्ष उमेदवार जिंकले आहेत.पंतप्रधान शेख हसीना या लोकसभा मतदारसंघ गोपालगंज-३ मधून मोठ्या मतफरकाने जिंकल्या आहेत. त्यांना २,४९,९६५ मतं मिळाली आहेत. त्यांच्याविरोधात उभे राहिलेले उमेदवार एम. निजाम उद्दीन यांना केवळ ४६९ मतं मिळाली आहेत. या जागेवर निवडणूक लढवणाऱ्या इतर उमेदवारांना २०० मतंसुद्धा मिळाली नाहीत. शेख हसीना गोपालगंज-३ मधून १९८६ पासून सलग आठव्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.