केंद्रीय मंत्री अमित शाहा आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी ही बैठक, ‘चांगली आणि सकारात्मक’ होती असं सांगितलं. तसेच अन्य एक बैठक पार पडणार असल्याचं शिंदेंनी सांगितलं असून त्यानंतरच मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार हे निश्चित होईल असं सांगण्यात आलं आहे. दिल्लीत दीड तास झालेल्या बैठकीनंतर शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ही माहिती दिली.
“बैठक उत्तम आणि सकारात्मक झाली. ही पहिली बैठक होती. आम्ही शाह आणि जे. पी. नड्डांशी चर्चा केली. महायुतीची अजून एक बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवलं जाईल. ही बैठक मुंबईमध्ये होणार आहे,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिल्लीत बैठकीनंतर दिली. एकनाथ शिंदे, भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांबरोबर महायुतीच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीमध्ये गुरुवारी रात्री उशीरा बैठक घेतली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार रात्रीच मुंबईत दाखल झाले. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेची चर्चा करण्यासाठी हे सर्व नेते केंद्रीय नेतृत्वाला भेटले होते.
याआधी शिंदेंनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंनी सरकार स्थापनेमध्ये कोणताच अडथळा नसून आपल्याला मिळालेली ‘लाडका भाऊ’ ही ओळख अधिक महत्त्वाची असल्याचं शिंदेंनी म्हटलं होतं. “कालच्या पत्रकार परिषदेत मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री पदासंदर्भात महायुतीत कोणताही गोंधळ नाहीये. हा लाडका भाऊ दिल्लीत चर्चेसाठी आला असून लाडका भाऊ ही ओळख कोणत्याही पदापेक्षा मोठी वाटते,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेंनी बुधवारी ठाण्यातील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपलं पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी बोलणं झाल्याचं सांगितलं. “मी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता. सरकार बनवताना, निर्णय घेताना माझ्यामुळे अडचण होईल असं मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केली. अडीच वर्षं तुम्ही राज्याचा विकास करण्याची, उद्योगधंदे आणण्याची संधी दिली आहे. तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय महायुती, एनडीएचे प्रमुख म्हणून जसा भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही अंतिम आहे. तुम्ही निर्णय घेताना एकनाथ शिंदेंची अडचण आहे असं मनात आणू नका, मी अमित शाह यांनाही फोन करुन भावना सांगितल्या. जो काही निर्णय असेल तो मान्य असेल,” असं सांगितल्याची माहिती शिंदेंनी पत्रकारांना दिली.