kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

दौंड रेल्वेच्या अन्य प्रलंबित मागण्यांचाही सकारात्मक विचार करून पूर्ण कराव्यात; खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वेकडे मागणी

बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्वाचे रेल्वे स्थानक अशी ओळख असणाऱ्या दौंड जंक्शनला पुणे विभागाशी जोडण्याच्या निर्णयाबद्दल रेल्वेमंत्र्यांचे आभार. मानतानाच रेल्वे खात्याकडे दौंडबाबत प्रलंबित असलेल्या मागण्यांचीही खासदार सुप्रिया सुळे यांनी आठवण करून दिली आहे. दौंड स्थानकाला उपनगरीय स्थानकाचा दर्जा देणे, डेमू ऐवजी इमू आणि कोरोना काळात बंद करण्यात आलेले एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत सुरू करणे आदी प्रमुख मागण्यांचा यात समावेश आहे.

दौंड रेल्वे स्थानकाला पुणे विभागाशी संलग्न करण्याबाबत काल (दि. २१) निर्णय घेण्यात आला. त्याबरोबरच आता या स्थानकाला
उपनगरीय स्थानकाचा दर्जा देणे आवश्यक आहे. याशिवाय डेमू गाड्यांमुळे नागरीकांची सोय होण्याऐवजी गैरसोयच होत आहे. हे लक्षात घेता येथे इएमयू सुरु होणे आवश्यक आहे. याबाबत मंत्रीमहोदयांनी सकारात्मक विचार करुन निर्णय घेणे गरजेचे आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी दौंड रेल्वेस्थानकावर सर्व रेल्वे गाड्यांना थांबा देणे आवशयक आहे. पर्यटनाच्या दृष्टीने तसेच जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्या राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय अभ्यासकांसाठी महत्वपूर्ण असणारे स्थलांतरीत पक्षी भिगवण येथील पाणलोट क्षेत्रात उतरतात. त्यांना पाहण्यासाठी हजारो अभ्यासक येथे येत असतात. त्यांना येथे पोहोचण्यासाठी रेल्वेची सेवा पुर्वीसारखी तत्पर राहिलेली नाही. पुर्वी प्रत्येक एक्सप्रेस गाडी या स्थानकावर थांबत असे. याचा फायदा पंचक्रोशीतील नागरीकांनीही होत होता. कोविड काळात हा थांबा बंद करण्यात आला. तो पूर्ववत सुरू करावा असे सुळे यांनी म्हटले आहे.

याबरोबरच अनेक गाड्यांना भिगवण हा थांबा देण्यात आलेला नाही. पर्यंटनाच्या आणि नागरीकांच्या सोयीच्या दृष्टीकोनातून रेल्वे मंत्रालयाने विचार करुन भिगवण येथे थांबा देण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, असे सुळे यांनी म्हटले असून याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष भेटी घेऊन चर्चा केल्याचे आणि निवेदने दिल्याची त्यांनी आठवण करून दिली आहे.