पाकिस्तानात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतमोजणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप विविध पक्षांकडून करण्यात येत आहे. एकूण २६५ जागांपैकी इम्रान खान यांच्या तहेरिक ए इन्साफ पक्षाद्वारे समर्थित ९७ उमेदवार विजयी झाले असून नवाझ शरिफ यांच्या मुस्लिम लिगचे ७६ तर पाकिस्तान पीपल्स पार्टीला ५४ जागा मिळाल्या आहेत. मात्र मतमोजणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर हेराफेरीचा आरोप करत विविध पक्षांचे कार्यकर्त्यांनी काल, शनिवारी आणि आज रविवारी सलग दोन दिवस विविध शहरांमध्ये धरणे प्रदर्शन केले. तहेरिक ए इन्साफच्या कार्यकर्त्यांनी रविवारी इस्लामाबाद ते पेशावर महामार्ग रोखून धरला होता.

पाकिस्तानात ८ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने अनेक जागांचे निकाल रोखून धरण्यात आले. याचा निषेध करण्यासाठी जमाते इस्लामी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कराची निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोप निदर्शने केली.

पाकिस्तानात मतमोजणीची प्रक्रिया निष्पक्षपणे पार पडली असती तर पाकिस्तान तहेरिक ए इन्साफ पक्षाला देशात स्पष्ट बहुमत मिळाले असतं असं सांगत लाहोर शहरात इम्रान खान समर्थकांनी रविवारी जोरदार निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना अटक केली.

पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीत मतमोजणीच्या वेळी मोबाइल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. शिवाय अनेक ठिकाणी हिंसेच्या घटना घडल्या होत्या.पाकिस्तान निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली होती. शिवाय खान यांच्या पक्षावर बंदी घालण्यात आली होती. यावेळच्या निवडणुकीत पाकिस्तानात तरुण मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी घराबाहेर पडल्याचे दिसून आले होते.