kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

गाझा शहरात कार्यरत असलेल्या एकमेव हॉस्पिटलचा काही भाग इस्रायलच्या हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त !

इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात अल-अहली बाप्टिस्ट हॉस्पिटलचा काही भाग उदध्वस्त झाला आहे. हे गाझा शहरात कार्यरत असलेलं शेवटचं हॉस्पिटल आहे.या हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की या हल्ल्यामध्ये हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभाग आणि शस्त्रक्रिया विभाग उदध्वस्त झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ ऑनलाईन पोस्ट करण्यात आला असून त्यात या दोन मजली इमारतीवर क्षेपणास्त्र पडल्यानंतर आगीच्या प्रचंड ज्वाळा निघताना आणि धूर निघताना दिसतो आहे.
व्हिडिओत या हॉस्पिटलमध्ये धावपळ करत असलेले लोक दिसत आहेत. हॉस्पिटलमधील बेडवर असलेल्या काही रुग्णांचाही त्यात समावेश आहे.

एकीकडे इस्रायलच्या लष्करानं (आयडीएफ) म्हटलं आहे की, “त्यांनी या हॉस्पिटलवर हल्ला केला, कारण या हॉस्पिटलमध्ये “हमासचं कमांड आणि कंट्रोल सेंटर होतं. गाझाच्या नागरी आपत्कालीन सेवेनुसार या हल्ल्यात कोणाचाही मृत्यू झालेला नाही.” तर दुसरीकडे, जेरुसलेमच्या एपिस्कोपल डायोसिसनं दिलेल्या वक्तव्यानुसार, “रुग्णांना घाईघाईनं हलवण्याच्या प्रक्रियेमुळे” डोक्याला दुखापत झालेल्या एका मुलाचा मृत्यू झाला. गाझामधील हमासद्वारे संचालित आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे की हॉस्पिटलची इमारत पूर्णपणे उदध्वस्त झाली आहे. त्यामुळे “रुग्ण आणि हॉस्पिटलचे कर्मचारी यांना जबरदस्तीनं इतरत्र हलवावं लागलं.”

इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे की “नागरिकांना किंवा हॉस्पिटलच्या आवारात होणारं नुकसान कमी करण्यासाठी त्यांनी पावलं उचलली आहेत. त्यात दहशतवाद्यांचं केंद्र असलेल्या परिसरात आगाऊ इशारा देणं, अचूकतेनं मारा करणाऱ्या शस्त्रांचा वापर करणं आणि हवाई टेहळणीचा समावेश आहे.”

हॉस्पिटलमध्ये काम करत असलेला एका स्थानिक पत्रकार म्हणाला की इस्रायली लष्करानं आपत्कालीन विभागात काम करत असलेल्या एका डॉक्टरला फोन करून हॉस्पिटल ताबडतोब रिकामं करण्याच्या सूचना दिल्या होत्या. “सर्व रुग्ण आणि विस्थापित लोकांनी सुरक्षित ठिकाणी जावं,” असं त्या अधिकाऱ्यानं सांगितलं होतं. “हॉस्पिटल सोडण्यासाठी तुमच्याकडे फक्त 20 मिनिटं आहेत,” असं तो अधिकारी म्हणाला होता.

बाहेर अजूनही अंधार असताना, हॉस्पिटलचे कर्मचारी आणि रुग्ण हॉस्पिटलच्या इमारतीतून बाहेर पडत असल्याचं सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये दिसत आहे.

महिला आणि मुलांसह डझनावारी पॅलेस्टिनी लोक, त्यांनी ज्या हॉस्पिटलमध्ये आश्रय घेतला होता, त्याच्या आवारातून पळत बाहेर जात असताना दिसत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *