kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया समोर

शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटावर खळबळजनक आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या, असं त्यांनी म्हटलं आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून देखील प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं असताना आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

मला असं वाटतं की, प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा ठेवल्या पाहिजेत, विशेषत: जे साहित्यिक आहेत, त्या साहित्यिकांना वारवार असं वाटतं की राजकारणी हे आमच्या स्टेजवर येऊ नयेत, किंवा ते तशाप्रकारचं वक्तव्य नेहमी करत असतात. मग त्यांनी देखील पार्टी लाईनवरच्या ज्या कमेंट आहेत, तशा कमेंट करणं योग्य नाहीये, त्यांनी देखील मर्यादा पाळायला पाहिजे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आमचे ओएसडी आणि पीएस सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री ठरवतात, आमच्या हातात काहीच नाही, असं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे, यावर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पहिली गोष्ट माणिकराव कोकाटे यांना कदाचित हे माहिती नसेल पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांनाच आहे. त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्यांकडे पाठवतात, आणि मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतात. मी कॅबिनेटमध्येच स्पष्ट सांगितलं होतं की, तुम्हाला जी नावं पाहिजे ती तुम्ही पाठवा. पण ज्या नावामध्ये ज्यांची नाव फिक्सर म्हणून किंवा चुकीच्या कामांमध्ये समावेश आहे, त्यांच्या नावांना मी परवानगी देणार नाही. आतापर्यंत माझ्याकडे 125 जणांची नावं आली, त्यातील 109 नाव मी क्लिअर केली आहेत, उर्वरीत नावांना परवानगी दिली नाही, कारण त्यांच्यावर कुठला न कुठला आरोप आहे, त्यामुळे कोणी नाराज झालं तरीही मी अशा लोकांच्या नावाला मान्यता देणार नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.