kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांची जवळपास 50 मिनिट बंद खोलीत झाली चर्चा

रशियाच्या कजान शहरात बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. 2020 पासून या भेटीची प्रतिक्षा होती. गलवानमधल्या रक्तरंजित संघर्षानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिली द्विपक्षीय चर्चा होती. कजान शहरात ब्रिक्स परिषद झाली. यामध्ये रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात सेतू बनण्याच काम केलं. भारत आणि चीनमध्ये तणाव काही प्रमाणात कमी झालाय. पण हे कसं शक्य झालं? चीनवर विश्वास ठेवता येईल का?.

चीन आणि भारत हे पुरातन संस्कृती आणि महत्त्वपूर्ण विकासशील देश आहेत. पाच वर्षानंतर दोन्ही देशातील तणाव कमी झालाय. पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम भारत-चीन बॉर्डरवर पेट्रोलिंग संदर्भात जी सहमती झाली, त्याचं स्वागत केलं. द्विपक्षीय चर्चा सुरु करण्याआधी पंतप्रधान मोदींनी शी जिनपिंग यांना स्पष्ट केलं की, “दोन्ही देशांमध्ये चांगल्या संबंधांसाठी भारत-चीन सीमेवर शांतता कायम राहणं आवश्यक आहे”

पीएम मोदी म्हणाले की, “तुम्हाला भेटून आनंद झाला. तुम्ही म्हणालात की, 5 वर्षानंतर आपली पहिली औपचारिक बैठक होतं आहे. भारत-चीन संबंध केवळ आपल्या लोकांसाठीच नाही, तर जागतिक शांतता, स्थिरता आणि प्रगतीसाठी आवश्यक आहेत. सीमेसंदर्भात जे एकमत झालय त्याचं आम्ही स्वागत करतो”

“बॉर्डरवर शांतता आणि स्थिरतेला आपलं पहिलं प्राधान्य असलं पाहिजे. परस्पर विश्वास, आदर आणि संवेदनशीलता आपल्या संबंधांचा आधार असला पाहिजे. या सर्व विषयांवर बोलायची संधी मिळाली आहे. आपण मोकळ्या मनाने बोलू, यावर माझा विश्वास आहे” असं पीएम मोदी म्हणाले.

या चर्चेसाठी 30 मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली होती. पण पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग जवळपास 50 मिनिट बंद खोलीत भारत-चीन संबंधांवर चर्चा करत होते. बैठक संपल्यानंतर मोदी आणि जिनपिंग हसत मीटिंग रुमबाहेर आले. उत्साहाने परस्परांशी हस्तांदोलन केलं. BRICS मध्ये मोदी-जिनपिंग यांची ही भेट भारत-चीन नव्या संबंधांची सुरुवात आहे का?. या भेटीमुळे भारत-चीनच्या नात्यात आलेला कडवटपणा दूर होईल का? हे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

भारतासोबत सीमावाद सोडवावा यासाठी व्लादिमीर पुतिन यांनी चीनवर दबाव टाकला. मागच्या काही महिन्यात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात बैठका झाल्या. याच बैठकांमध्ये मोदी आणि जिनपिंग यांच्या द्विपक्षीय चर्चेचा कार्यक्रम ठरला.