रेल्वे प्रवाशांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी भारताने तयार केलेली वंदेभारत ट्रेन प्रचंड गाजली आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत उभारलेल्या या पहिल्या सेमी हायस्पीड ट्रेनला अगदी परदेशातूनही मागणी आली होती. सध्या देशभरात 2 डिसेंबर 2024 च्या तारखेपर्यंत भारतीय रेल्वेच्या विविध ब्रॉडगेज मार्गांवर लघु आणि मध्यम अंतराच्या एकूण 136 वंदेभारत धावत आहेत. या सर्व वंदेभारत चेअरकार असणाऱ्या आहेत. त्यामुळे वंदेभारतचा स्लीपर कोचची सोय असलेला प्रोटोटाईप तयार केला असून त्याच्या चाचण्या सुरु आहेत. आता देशात आणखीन 10 वंदेभारत स्लीपर कोचची निर्मिती सुरु असून एकूण 200 वंदेभारत एक्सप्रेसचे टेंडर विविध टेक्नॉलॉजी पार्टनरना देण्यात आल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात माहिती देताना सांगितले.
वंदेभारत एक्सेसला ऑक्टोबर 2024 पर्यंत सरासरी 100 टक्के प्रवासी भारमान मिळाल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत लेखी उत्तरात दिली आहे. सध्या देशात लांब आणि मध्यम पल्ल्याच्या मार्गांसाठी दहा वंदे भारत स्लीपर कोच ट्रेनची निर्मिती सुरु आहे. याशिवाय आणखी 200 वंदेभारत स्लीपर कोचची निर्मिती करण्यासाठी टेक्नॉलॉजी पार्टनरना टेंडर वाटप केले आहे. वंदेभारत स्लीपर कोचचा प्रोटोटाईपची फिल्ड ट्रायल सुरु असून या ट्रायलच्या यशावर पुढील स्लीपर कोच कधी कारखान्यातून कधी बाहेर ठरणार हे निश्चित होणार आहे.
एका अन्य प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की एप्रिल 2018 पासून भारतीय रेल्वेने आयसीएफ कोचची निर्मिती पूर्णपणे बंद केली आहे. केवळ एलएचबी कोचची निर्मिती यापुढे कारखान्यात होणार आहे. साल 2004-14 दरम्यान भारतीय रेल्वेने 2,337 एलएचबी कोचची निर्मिती केली होती. आता साल 2014-24 दरम्यान भारतीय रेल्वेने तब्बल 36,933 एलएचबी कोचची निर्मिती केली असून ती आधीच्या निर्मिती पेक्षा 16 पट जादा आहे.
अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम, 2016 नुसार ‘सुगम्य भारत मिशन’ अंतर्गत भारतीय रेल्वेने दिव्यांग प्रवाशांचा प्रवास सुखकारक करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यानुसार नोव्हेंबर 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतीय रेल्वेने देशातील 399 रेल्वे स्थानकांवर 1,512 सरकते जिने, 609 रेल्वे स्थानकांवर 1,607 लिफ्ट बसविल्या आहेत. दिव्यांग प्रवाशांच्या सोयी सुविधेत गेल्या दशकापेक्षा या दशकांत या सेवेत अनुक्रमे 9 आणि 14 पट वाढ केलेली आहे.