प्रसिद्ध लेखक, वक्ते व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सोबत सुनीताराजे पवार यांची कार्यवाह आणि विनोद कुलकर्णी यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे पुढील तीन वर्षांसाठी महामंडळाचे कार्यालय मुंबईहून पुण्यात स्थलांतरित झाले आहे. महामंडळाचे कार्यालय पुण्यात आल्यामुळे ९९वे, १००वे व १०१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात भरविण्याचा मान पुणेकरांना मिळणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घटक व संलग्न संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष गुरय्या स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मावळत्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी प्रा. जोशी आणि इतर नूतन पदाधिकाऱ्यांकडे महामंडळाचा कार्यभार सोपवला.
हे अध्यक्षपद माझ्यासाठी सन्मान आणि जबाबदारी : प्रा. मिलिंद जोशी
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रा. मिलिंद जोशी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाची निवड माझ्यासाठी एक मोठा सन्मान असून, ती एक महत्त्वाची जबाबदारीही आहे. हा सन्मान मी मनापासून कृतज्ञतेने आणि नम्रतेने स्वीकारतो. माझ्यामध्ये साहित्याची आवड निर्माण करणाऱ्या माझ्या पालकांचे मी मन:पूर्वक आभार मानतो, असे ते म्हणाले.
भारती विद्यापीठाचा सातत्याने मिळणारा पाठिंबा, तसेच प्राचार्य शिवाजीराव भोसले, डॉ. आर.सी. ढेरे, डी.एम. मिरासदार आणि शिवाजी सावंत यांसारख्या साहित्य क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभल्यानेच आज या पदावर पोहोचण्यास मला मदत झाली, असे ते म्हणाले.
सामान्य पार्श्वभूमीतून साहित्यप्रेमामुळे आणि चिकाटीच्या जोरावर इथवरचा प्रवास साधता आला,असे सांगून, आगामी ९९ वे, १०० वे आणि १०१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे ऐतिहासिक, वैशिष्ट्यपूर्ण आणि संस्मरणीय करण्यासाठी पूर्ण समर्पणाने काम केले जाईल अशी ग्वाही प्रा. जोशी यांनी दिली.
Leave a Reply