चार दिवस सासूचे, दामिनी आणि वादळवाट सारख्या टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 62 व्या वर्षी उजवणे यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. तर मनोज कुमार यांच्या नंतर विलास उजवणे यांचंही निधन झाल्याने सिनेक्षेत्राला मोठा झटका बसला आहे. डॉ. विलास उजवणे हे गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होते. त्यांना काही वर्षांपूर्वी ब्रेन स्ट्रोकही आला होता. त्याचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला होता. त्यांना हृदयविकाराचाही त्रास होत होता. गंभीर आजारामुळे उपचाराचा खर्च वाढत असल्याने त्यांना आर्थिक अडचणीचाही सामना करावा लागला होता. त्यांच्या मित्र परिवाराकडून आर्थिक मदतीचं आवाहनही करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मीरा रोड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं.
डॉ. विलास उजवणे हे रंगभूमीवरचे कलाकार होते. नाटकांमध्ये आपला ठसा उमटवल्यानंतर त्यांनी थेट टीव्ही मालिकांकडे आपला मोर्चा वळवला होता. त्यांनी मराठीच नव्हे तर हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांच्या नैसर्गिक अभिनयामुळे ते घराघरामध्ये पोहोचले होते. प्रेक्षकांनी त्यांना नकारात्मक भूमिकांमंध्येही स्वीकारले होते. उजवणे यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
चार दिवस सासूचे’, ‘दामिनी’, ‘वादळवाट’ आदी त्यांच्या मालिका विशेष गाजल्या. उजवणे यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे ११० चित्रपट, विविध १४० मालिकांमध्ये काम केलं. तसेच व्यावसायिक नाटकांचे त्यांनी तब्बल ३ हजारांहून अधिक प्रयोग केले आहेत. मात्र, असं असलं तरी उजवणे यांना ओळख मिळाली ती टीव्ही मालिकांमधून. टीव्ही मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. या भूमिकांमुळेच ते घराघरात पोहोचले. उजवणे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
Leave a Reply