मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं आज निधन झालं आहे. आज त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडणार आहे. दरम्यान सुहासिनी यांच्या जाण्याने कलाविश्वात शोककळा पसरली आहे.

सुहासिनी देशपांडे यांनी मराठीसह हिंदीतील अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अनेक सिनेमांमधून सुहासिनी यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्या रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम या सिनेमातही दिसल्या होत्या. आता त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झाल्याची भावना आहे.

अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांनी लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी मराठी सिनेमाच्या माध्यामातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 70 वर्षात त्यांनी 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे सोशल मीडियावर लाखो चाहते होते. आज त्याच्या जाण्याने कलासृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सुनासिनी देशपांडे मनाचा कुंकू (1981), कथा (1983), आज झाले मुक्त मी (1986), आई शप्पथ…! (2006), चिरंजीव (2016), धोंडी (2017) या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्याचप्रमाणे सिंघम या सिनेमातही त्या झळकल्या होत्या. कथा अकलेच्या कांद्याची, राजकारण गेलं चुलीत आणि सासुबाईंचं असंच असतं नाटकांमधूनही त्या रंगभूमीवर दिसल्या होत्या.

त्यांच्या रंगभूमीवरील योगदानासाठी आणि कार्याबद्दल सुहासिनी देशपांडे यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने 2015 साली सन्मानित करण्यात आलं.