Breaking News

शरद पवारांच्या निवृत्तीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. एकीकडे सर्व पक्ष जोरदार प्रचार करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. “ अजून माझे दीड वर्ष आहे. दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल. आतापर्यंत १४ निवडणुका लढल्या. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे”, असे विधान शरद पवारांनी केले. शरद पवार या विधानानंतर आता ते राजकारणातून निवृत्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “तुम्ही ठाम उभे रहा आणि पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. आम्ही लढायला तयार आहोत. तुमच्यासारख्या सेनापतींची आम्हाला गरज आहे”, अशी भावूक साद संजय राऊतांनी शरद पवारांना दिली.

“शरद पवार हे संसदीय राजकारणातील महामेरु आहेत. ते राजकारणातील भीष्म पितामह आहेत. गेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी देशाच्या संसदीय राजकारणात विधानसभा, लोकसभा, विधानपरिषद, राज्यसभा अशा सर्व सभागृहात त्यांनी काम केले आहे. केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यांच्या इतक्या संसदीय राजकारणाचा अनुभव असणारा नेता देशाच्या राजकारणात नाही”, असे संजय राऊत म्हणाले.