राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्दिकी यांचे पुत्र, आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे इथल्या निर्मलनगर परिसरातील कार्यालयाबाहेरच घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेबद्दल समजताच अभिनेता सलमान खान, शिल्पा शेट्टी, संजय दत्त यांसारखे सेलिब्रिटी शनिवारी रात्रीच लिलावती रुग्णालयात पोहोचले. पापाराझी अकाऊंटवर या सेलिब्रिटींचे व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. यामध्ये शिल्पाला अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळतंय. या घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

शनिवारी रात्री शिल्पा तिचा पती राज कुंद्रासोबत लिलावती रुग्णालयात पोहोचली. यावेळी ती तिचे अश्रू रोखण्याचा प्रयत्न करताना दिसली. कारमध्ये बसली असतानाही शिल्पाला रडू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. गाडीतून उतरल्यानंतर फोटोग्राफर्स आणि पत्रकारांना त्यांच्याभोवती घोळका गेला. या घोळक्यातून राज तिला पुढे नेण्यास मदत करतो. यावेळीही शिल्पा प्रचंड दु:खी असल्याचं पहायला मिळालं. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा पती झहीर इक्बालसुद्धा बाबा सिद्दिकी यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल झाला होता. बाबा सिद्दिकी यांचे बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींसोबत मैत्रीपूर्ण नातं होतं. त्यांच्याकडून आयोजित होणाऱ्या इफ्तार पार्टीत इंडस्ट्रीतील असंख्य सेलिब्रिटी आवर्जून उपस्थित राहतात.

सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडून पळ काढत असलेल्या तिघांपैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मात्र हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस पक्षातून तीन वेळा आमदार आणि 2004-2008 या काळात मंत्री राहिलेले सिद्दिकी यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. राजकीय वर्तुळात प्रसिद्ध असलेले सिद्दिकी यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांशी मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचं वृत्त समजताच रात्री उशिरापर्यंत लिलावती रुग्णालयात नेते, कलाकार यांची रीघ लागली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *