kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद व अतिजलद गाड्यांना थांबा ;रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नांना यश…

जलद व अतिजलद दहा गाड्यांना रोहा स्थानकावर थांबा देण्याचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते २५ जानेवारी २०२५ रोजी पार पडला. रोहा येथे जलद व अतिजलद गाड्यांना थांबा मिळावा ही गेल्या कित्येक वर्षांपासून रोहावासियांची मागणी होती. आजपासून रोहा येथे कोचुवेली इंदोर एक्स्प्रेस, कोयंबटुर हिसार एक्स्प्रेस, कोचुवेली चंढीगड एक्स्प्रेस, दादर तिरुनेलवेली एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगांव एक्स्प्रेस या दहा जलद व अतिजलद गाड्या थांबणार आहेत. यावेळी जलद गाडीतून प्रवास करणार्‍या पहिल्या प्रवाशाला खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते तिकीट देऊन शुभारंभ करण्यात आला.

रोहेकरांचे कित्येक वर्षाचे स्वप्न पूर्ण करत असल्याचा आनंद -सुनिल तटकरे

जनतेची कामे करताना मन… संवेदना असावी लागते…कामाची तत्परता असावी लागते आणि याच भावनेने रोहेकरांचे कित्येक वर्षाचे स्वप्न पूर्ण करत असल्याचा आनंद आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आणखी काय म्हणाले सुनिल तटकरे ?

दूरपल्ल्याच्या गाड्या रोहा येथे थांबाव्यात यासाठी प्रयत्न होता आणि आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ते सत्यात उतरले आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री यांचे खासदार सुनिल तटकरे यांनी विशेष आभार मानले आणि त्यांना धन्यवाद दिले. रोहा रेल्वे स्थानकावर अतिजलद गाड्यांना थांबा मिळाल्यानंतर माणगाव, रोहा, कोलाड, पेण येथील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणार्‍या गाड्या इथे थांबणार आहेत. अजून नवीन थांबे कसे मिळतील यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले जातील असे आश्वासनही सुनिल तटकरे यांनी दिले.

रेल्वे स्थानकाचे आधुनिक नूतनीकरण करताना रेल्वे स्थानकाच्या बाहेरील सुशोभीकरण होणारच आहे शिवाय स्थानकाचे अंतर्गत सुशोभीकरण होणार आहे त्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रोहेकरांच्या भवितव्याला याचा उपयोग होणार आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

रोहा स्थानकावर अतिजलद दहा गाड्यांना थांबे खासदार सुनिल तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाले आहेत आणि आज त्यांची सुरूवात होत आहेत हा आपल्या आयुष्यातील महत्वपूर्ण दिवस आहे असे उद्गार महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी काढले. २० कोटी रुपये खर्च करून रोहा रेल्वे स्थानकाचे लवकरच सुशोभीकरण होणार आहे. सुविधा उपलब्ध होत आहेत याचे कारण आपल्या हक्काचा खासदार सुनिल तटकरे यांच्या रुपाने मिळाला आहे असेही अदितीताई तटकरे म्हणाल्या.

यावेळी कोचुवेली इंदोर एक्स्प्रेस (२०९३१) या अतिजलद गाडीला हिरवा झेंडा दाखवून खासदार सुनिल तटकरे यांनी शुभारंभ केला. पहिली अतिजलद रेल्वे रोहा येथे थांबली.त्यावेळी महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता वाय. पी. सिंग, एडीआरएन श्री शशीभूषण, एसीएम राजीव रंजन, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.