kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

सुनीता विल्यम्सचा अखेर अंतराळातून परतीचा प्रवास; कधी उतरणार पृथ्वीवर?

‘ड्रॅगन’ या स्पेसएक्सच्या अंतराळयानामधून भारतीय वंशांच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या परतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 18 मार्च रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार, 10 वाजून 35 मिनिटांनी हे अंतराळयान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनहून वेगळं अर्थात अनडॉक केलं जाईल. ड्रॅगन या अंतराळयानाचं अनडॉकिंग अनेक गोष्टींवर अवलंबून असेल. यामध्ये अंतराळयान आणि रिकव्हरी टीमची तयारी, हवामान, समुद्राची परिस्थिती आणि इतरही अनेक कारणीभूत ठरणारे घटक समाविष्ट आहेत. नासा आणि स्पेसएक्स हे क्रू-9 च्या परत येण्याच्या वेळेलाच स्प्लॅशडाउन स्थानाची जागा निश्चित करतील.

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांनी 5 जून 2024 रोजी परीक्षणयान असलेल्या स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली होती. तिथे आठ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते; मात्र, त्यांच्या अंतराळयानामध्ये बिघाड झाल्यामुळे हे दोघेही तिथेच अडकून पडले.

ड्रॅगनच्या परतीचं असं आहे वेळापत्रक :

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 5 जून 2024 रोजी स्टारलाइनरमधून इंटरनॅशनल स्पेस सेंटरसाठी उड्डाण घेतलं होतं. तिथं 8 दिवसांसाठी गेलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर तब्बल नऊ महिने अडकून पडले होते.

आता हे दोघेही आता परतणार असून त्यांच्या परतीच्या प्रवासाचं वेळापत्रक समोर आलं आहे.

18 मार्च सकाळी 08.15 वाजता – हॅच क्लोज (यानाचं झाकण बंद केलं जाईल)

18 मार्च सकाळी 10.35 वाजता – अनडॉकिंग (आयएसएस पासून वाहन वेगळं होईल)

19 मार्च 02.41 वाजता – डीऑर्बिट बर्न (पृथ्वीच्या वातावरणात यानाचा प्रवेश)

19 मार्च सकाळी 03.27 वाजता – स्प्लॅशडाउन (यान समुद्रात उतरेल)

19 मार्च सकाळी 05.00 वाजता – पृथ्वीवर परत येण्यासंदर्भात पत्रकार परिषद होईल

नासानं असं सांगितलंय की, हवामानाचा अंदाज घेऊनच स्प्लॅशडाऊनची जागा ठरवली जाईल. यान परत येण्याची ही अंदाजे वेळ आहे.