kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

तहव्वूर राणा भारतात ?? नेमकं प्रकरण काय ??

मुंबईत २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणा याला अमेरिकेतून भारतात आणल्यानंतर काँग्रेस आणि भाजपामध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे. तहव्वूर राणाला भारतात आणल्याचे श्रेय घेतल्याबद्दल काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी गुरुवारी मोदी सरकारवर टीका केली आणि म्हटले की, हे “यूपीए सरकारच्या काळात या प्रकरणी केलेल्या कामाचे परिणाम आहेत.

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर बोलताना चिदंबरम म्हणाले की, “मी हे स्पष्ट करतो की, मोदी सरकारने ही प्रक्रिया सुरू केली नाही किंवा त्यांना यामध्ये कोणताही नवीन यश मिळाले नाही. त्यांना फक्त यूपीएच्या काळात सुरू झालेल्या परिपक्व, सातत्यपूर्ण आणि धोरणात्मक राजनैतिकतेचा फायदा झाला. हे प्रत्यार्पण कोणत्याही दिखाव्याचा परिणाम नाही, तर राजनैतिकता, कायदा अंमलबजावणी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रामाणिकपणे आणि कोणत्याही प्रकारे छाती न ठोकता केले तर भारतीय राज्य काय साध्य करू शकते याचा हा पुरावा आहे.”

मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर हुसेन राणाला अखेर भारतात आणण्यात आले असून, त्याला अमेरिकेतून भारतात आणण्याची जबाबदारी राष्ट्रीय तपास संस्थेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली होती. यामध्ये एनआयएचे महानिरीक्षक आशिष बत्रा उपमहानिरीक्षक जया रॉय यांचा समावेश होता. या दोन्ही अधिकाऱ्यांनी राणाची अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

एनआयएचे हे पथक तहव्वूर राणाला भारतात आणण्यासाठी रविवारीच अमेरिकेत पोहोचले होते. मंगळवारी संध्याकाळी लॉस एंजेलिसमध्ये उपमहानिरीक्षक जया रॉय यांनी राणाला ताब्यात घेण्यासाठी ‘सरेंडर वॉरंट’वर स्वाक्षरी केली होती. यानंतर, भारतीय पथकाने बुधवारी सकाळी राणाला एका खास विमानाने भारताकडे रवाना केले होते. या कारवाईत इतर तीन गुप्तचर अधिकाऱ्यांनीही सहकार्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

कोण आहे तहव्वूर राणा?

तहव्वूर राणा हा पाकिस्तानी-कॅनेडियन नागरिक असून, त्याला अमेरिकेत बंदी घातलेल्या दहशतवादी संघटने लष्कर-ए-तैयबाचे काम केल्याबद्दल आणि २६ ते २९ नोव्हेंबर २००८ दरम्यान मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी लष्कर-ए-तैयबाला मदत केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. दरम्यान मुंबई दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा दल, नागरिक आणि परदेशी पर्यटकांसह १७४ हून अधिक लोकांचा बळी गेला होता.

तहव्वुर राणा अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहत होता. लष्कर-ए-तैयबा आणि डेव्हिड हेडलीशी संबंध असल्याने भारत गेल्या अनेक वर्षांपासून राणाच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत होता. अमेरिकेतून आलेले विशेष विमान दिल्ली विमानतळावर दाखल होताच राणाला एनआयएने अटक केली. यानंतर आता पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून टीका केली आहे.

तहव्वूर राणाला आणायला १५ वर्षे का लागली?

आनंद आहे, तहव्वूर राणाला भारतात आणले असेल तर दाऊदला का आणले नाही. या बॉम्बस्फोटामागे कोण होते? हे सर्वांना माहिती आहे. जबाबदारी स्वीकारणाऱ्या दाऊदला भारतात आणावे. महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर राणाला भारतात आणून राजकारण करू नये, त्याला फाशी दिली पाहिजे. तहव्वूर राणाला आणायला १५ वर्षे का लागली? महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमध्ये त्याचा उपयोग करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतील. कामाच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाहीत, म्हणून आता जुमलेबाजी करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

दरम्यान, तहव्वूर राणा याला भारतात आणले गेले आहे, याबाबत पत्रकारांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, चांगली गोष्ट आहे. भारताचे मोठे यश आहे. ही पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया आहे. त्याच्याविरुद्ध कोणता खटला दाखल होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. आता याबद्दल बोलणार नाही. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याबद्दल बोलेन, असे उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *