जातीय जनगणना करा, आरक्षणाची मर्यादा हटवा यासह इतर मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि. ३०) नेहरू चौकातून उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.

या वेळी दिलेल्या निवेदनातून जातीनिहाय जनगणना करा, आरक्षणाची ५० टक्के मर्यादा उठवा, सर्व कामगारांना पंचवीस हजार रुपये किमान वेतन करा, कष्टकरी वर्गाला ६० वर्षांनंतर पाच हजार रुपये पेन्शन द्या, कामगार भरती करा, महागाई कमी करा, कंत्राटीकरण खाजगीकरण थांबवा, प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय मागे घ्या, महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध लावण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा, मागेल त्याला रेशन द्या, शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा, शेतीमालाला हमीभाव द्या, स्वामिनाथन आयोग लागू करा, अतिक्रमणधारक, वनजमीन, गायरान जमीनधारकांना पट्टे वाटप करा, घरकुल व निराधारांचे थकीत अनुदान त्वरित द्या, घरकुलसाठी पाच लाख रुपयांचे अनुदान, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, जिल्हा परिषद शाळेचे खाजगीकरण बंद करा शेतमजुरांसाठी केंद्रीय कायदा करा प्राथमिक आरोग्य केंद्र व सरकारी दवाखान्यातील सर्व रिक्त पदे भरा आदी मागण्यांचा समावेश होता.

या आंदोलनाचे नेतृत्व हौसलाल रहांगडाले, मिलिंद गणवीर, रामचंद्र पाटील, करुणा गणवीर, परेश दुरुगवार, शेखर कनोजिया, प्रल्हाव उके, शालू कुथे, गुणंतराव नाईक अशोक मेश्राम, कल्पना डोंगरे, सुरेश रंगारी, पौर्णिमा चुटे यांनी केले.