उत्तर प्रदेशातील संभलमध्ये ४६ वर्ष जुने शिव मंदिर उघडण्यात आले. या प्राचीन मंदिरात खोदकाम करण्यात आले. त्यात शिवलिंग, हनुमानजीची मूर्ती मिळाली. तसेच परिसरात विहीरसुद्धा मिळाली. त्यानंतर प्रशासनाने विहिरीत खोदकाम सुरु केले. त्यात माता पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय स्वामी यांची मूर्ती मिळाली. १९७८ पासून हे मंदिर बंद होते. प्रशासनाने या मंदिराची स्वच्छता केली आणि विधी विधान आणि मंत्रोच्चारात पूजा आरती करण्यात आली. सोमवारी सकाळी मोठ्या संख्येने भाविक मंदिरात पोहचले. भाविकांनी मंदिरात जलाभिषेक केले.
संभलमधील दीपसरायजवळ असलेल्या खग्गू सराय भागात चार दशकांपासून बंद असलेले मंदिर शनिवारी प्रशासनाने उघडले. त्यानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली. पूजा-अर्चना सुरु करण्यात आली. प्रशासनाने मंदिराजवळ असलेल्या विहिरीचे खोदकाम सुरु केले. ही विहीर फूट खोदल्यावर त्यातून मूर्त्या निघू लागल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले.
संभल जिल्ह्यात वीज चोरीची तपासणी करताना प्राचीन हिंदू मंदिरात जुने अवशेष मिळाले. त्यानंतर प्रशासनाने मंदिराच्या जवळपास असणारे अतिक्रमण काढले. मंदिरात असलेल्या देवी-देवतांच्या मूर्तींची स्वच्छता केली. त्यानंतर पूजापाठ सुरु करण्यात आले. मंदिराच्या भागात असणाऱ्या विहिरीचे खोदकाम करण्यात आले. त्यात तीन मूर्ती मिळाल्या.
संभलमधील या भागात कधीकाळी हिंदूंची वस्ती मोठ्या प्रमाणावर होती. त्याची आठवण सांगताना ८२ वर्षीय विष्णू शरण रस्तोगी म्हणतात, या भागातील कार्तिक शंकर मंदिर हे लोकांचा श्रद्धेचा विषय होता. आमच्या पूर्वजांनी या मंदिराची निर्मिती केली होती. सकाळी, संध्याकाळी भाविक मंदिरात दर्शनासाठी येते होते. भजन-कीर्तन होत होते. १९७८ मध्ये या भागात दंगल झाली. त्यानंतर या भागातील हिंदूंना हा परिसर सोडला. मंदिरात पुजा-अर्चना बंद झाली. कारण मंदिराच्या चारही बाजूंनी मुस्लिम लोकांची संख्या जास्त होती. तसेच जवळपास ४० हिंदू राहत होते. दंगलीनंतर सर्वांनी हा भाग सोडला.