Breaking News

ठाणे लोकसभा : हितेंद्र ठाकूर यांचा राजन विचारे यांना बिनशर्त पाठिंबा !

ठाणे लोकसभेसाठी इंडिया आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांना हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने (बविआ) बिनशर्त पाठिंबा दर्शविला आहे. बविआ पक्षाचे ठाणे जिल्हा सचिव मयुर तोरणे यांनी बिनशर्त पाठिंब्याचे पत्र राजन विचारे यांना दिले आहे.

वसई-विरार या भागात मोठे अस्तित्व असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने (बविआ) बिनशर्त पाठिंबा दर्शविला आहे. बविआने २०१७ मध्ये ठाणे महापालिका निवडणूकीत त्यांच्या पक्षाचे उमेदवार उभे केले होते. अनेक ठिकाणी त्यांना मतदान झाले होते. बविआ पक्षाचे बळ पालघर जिल्ह्यातील वसई-विरार, नालासोपारा पट्ट्यात अधिक आहे. मिरा भाईंदर, ठाणे जिल्ह्यातही या पक्षाचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघात बविआ पक्षाने राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पालघर मतदारसंघात तिरंगी लढत आहे.

बविआ पक्षाचे ठाणे जिल्हा सचिव मयुर तोरणे यांनी पक्षाच्या वतीने पत्रक काढत इंडिया आघाडीचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांना बिनशर्त पाठिंबा दर्शविला आहे. राजन विचारे यांचे ठाणे लोकसभा मतदारसंघात मोठे सामाजिक कार्य आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून देण्यासाठी त्यांना पाठिंबा देत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. ठाणे महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणूकीत बविआ पक्षाने त्यांचे उमेदवार उभे केले होते. त्यावेळी नगरसेवक म्हणून उमेदवार निवडून आले नव्हते. पंरतु त्यांना इंदिरानगर, वागळे इस्टेट भागातून मतदान झाले होते.