आज मराठी भाषा दिन आहे, आणि मराठी भाषा दिनाच्या दिवशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे ठाणे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने एक जीआर काढला आहे. त्यात मराठीतून ज्यांनी पद्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे, त्यांना वेतनवाढ मिळणार नाही असं म्हटलं आहे, आता हा जीआर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले अविनाश जाधव?
मराठी भाषा वाढावी, मराठीतून मुलांनी शिक्षण घ्यावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, पण ज्यांनी मराठीतून शिक्षण घेतलं असेल त्यांच्यासाठी जर असे जीआर निघत असतील तर कोण मराठीमधून शिक्षण घेणार? असा सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाली की आम्ही याबाबत अतिरिक्त आयुक्तांना भेटून जाब विचारला आहे, त्यांनी आज संध्याकाळपर्यंत याबाबत निर्णय घेऊ असं म्हटलं आहे. आज संध्याकाळपर्यंत या जीआरबाबत निर्णय होऊन तो रद्द होईल. ठाणे महापालिकेने आज मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रम घेणं गरजेचं होत, हे लाखो करोडो रुपये खर्च करुन इतर कार्यक्रम घेतात, याचा त्याचा सत्कार करतात मात्र या महापालिकेत सर्वात जास्त कर्मचारी मराठी असतांना कुठलाही कार्यक्रम पालिकेने घेतला नाही, याबाबत देखील आम्ही जाब विचारला आहे, असंही अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.
प्रत्येक सरकारी आस्थापनाने मराठी भाषा दिन जोरात साजरा करायला हवा होता, परंतु ठाण्यात असं कुठेही दिसलेलं नाही, किंवा महाराष्ट्रात दिसलेलं नाही. बाकीच्या गोष्टीत निवडणुका आल्या की यांना मराठी आणि मराठी माणूस आठवतो. मराठी भाषा दिन महाराष्ट्र शासनानेच जाहीर केला आहे, त्याची जाण या लोकांना नाहीये का? आज बरेचसे कार्यक्रम सरकारकडून आयोजित करणं आवश्यक होतं, मात्र असे कुठलेही कार्यक्रम या महाराष्ट्रात झालेले नाहीत. यावरून एक गोष्ट कळते सरकारला मराठी भाषेच वावड आहे, अशी टीका यावेळी जाधव यांनी केली आहे.
दरम्यान जीआर मागे घेतला नाही तर उद्या सकाळी पुन्हा आम्ही येऊन बसू, उद्या यांना पुन्हा यांची जागा आम्ही दाखवणार पण हे परिपत्रक मागे घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण हजारो, शेकडो कर्मचाऱ्यांंचं यात नुकसान होणार आहे, असा इशाराही यावेळी अविनाश जाधव यांनी दिला आहे.