बॉलीवूडचा एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंह सध्या आयुष्याच्या नव्या टप्प्यावर आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात रणवीरने वडील होण्याच्या आनंदावर व्यक्त होताना सांगितलं की, त्याच्या जीवनातील हा क्षण एखाद्या जादुई क्षणासारखा आहे. नुकतंच रोहित शेट्टीच्या बिग-बजेट चित्रपट ‘सिंघम अगेन’मध्ये झळकलेल्या रणवीरने एका कार्यक्रमात तो बाबा झाल्याने त्याच्या आयुष्यात काय बदल झाला यावर भाष्य केलं आहे.
वडील झाल्याच्या अनुभवाचे वर्णन करताना रणवीरने सांगितलं, “माझा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. ही अनुभूती जादूसारखी आहे. मी खूप आनंदी आहे. माझा आनंद व्यक्त करण्यासाठी कुठल्याच भाषेत शब्द नाहीयेत. जेव्हा तुम्हाला दुःख होत तेव्हा तुम्ही ते शेअर केल्यास ते कमी होत आणि जेव्हा तुम्हाला आनंद होतो तेव्हा तो शेअर केल्यास तो दुपटीने वाढतो. त्यामुळे मी हा आनंद शेअर करत आहे. हे एखाद्या जादूसारखं आहे.”
कार्यक्रमात रणवीरने असंही नमूद केलं की, “मी खूप दिवसांपासून आता वडिलांच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे.” या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे आणि चाहत्यांकडून रणवीरच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.