Breaking News

रुपाली ठोंबरेंनी शेअर केलेला ‘तो’ स्क्रीनशॉट खोटा, जितेंद्र आव्हाडांची पोलिसात तक्रार, नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेवरुन सध्या राजकारण तापले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सहभाग घेतला होता. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केले होते. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी निघालेल्या मोर्चात जितेंद्र आव्हाड कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी? सांगून टाका जितेंद्र भाऊ आव्हाड. उत्तर दया, असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी विचारला होता. आता जितेंद्र आव्हाड यांनी याविरोधात रुपाली ठोंबरेंची पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रुपाली ठोंबरेंसह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयटी ॲक्ट्नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. यात त्यांनी रुपाली ठोंबरेंविरुद्ध निशाणा साधला आहे. तसेच रुपाली ठोंबरे यांनी शेअर केलेला स्क्रीनशॉट खोटा असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

माझा खोटा वाॅटसॲप चॅटचा वायरल करणाऱ्यांविरुद्ध काल रात्री मी बीडमधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा (एफआयआर) दाखल केला. कर नाही और डर कशाला? फक्त अपेक्षा एवढीच आहे की, हा वाॅटसॲप चॅटचा स्क्रीनशॉट कसा खोटा (माॅर्फ केलेला ) आहे, याची संपूर्ण माहाती मी ट्वीटद्वारे (एक्स पोस्टद्वारे) दिली आहे. त्याचा वापर केला तर पोलिसांना, ‘ चौकशी सुरू आहे’ , हे सांगण्याचे कारणच उरणार नाही. मी स्वतःच सर्व तांत्रिक बाबी माझ्या ट्वीटमध्ये सांगितलेल्या माहितीचा वापर केला तर पोलिसांना फक्त कारवाईच करायची आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

जितेंद्र आव्हाड यांनी शिवराज नावाच्या व्यक्तीशी व्हॉट्सअ‍ॅप चॅट केला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला होता. उद्याचा मसाला रेडी ठेव शिवराज….मी पहिली तुझी भेट घेईन नंतर मोर्चाकडे जाईल… मुंड्या विरोधात आणि वाल्या विरोधात जे जे काही असेल ते सगळे गोळा कर. पैसे लागले तर मला फोन कर. पण मटेरियल तयार ठेव. तुझा फोन लागत नाही सकाळपासून प्रयत्न करतोय, अशा प्रकारची चॅट यात पाहायला मिळत आहे.

त्यावर आता जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टीकरण दिले आहे. “माझा खोटा व्हॉटसॲप चॅटचा वायरल करणाऱ्यांविरुद्ध काल रात्री मी बीडमधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा (एफआयआर) दाखल केला. कर नाही और डर कशाला? फक्त अपेक्षा एवढीच आहे की, हा वाॅटसॲप चॅटचा स्क्रीनशॉट कसा खोटा (माॅर्फ केलेला ) आहे, याची संपूर्ण माहाती मी ट्वीटद्वारे (एक्स पोस्टद्वारे) दिली आहे, असे जितेंद्र आव्हाडांनी म्हटले आहे.

माझा खोटा वाॅटसॲप चॅट वायरल करणाऱ्यांची घाणेरडी मानसिकता कशी स्पष्ट झाली आहे ते बघा… १) माझ्या वाॅटसॲप डीपीवर माझा फोटो नसून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. ज्यावेळेस संसदेत अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ,”आंबेडकर आंबेडकर हे फॅशन झाले आहे”, असे अनुद्गार काढले. तेव्हापासून आंबेडकर ही फॅशन नाही तर “पॅशन” असे म्हणत हा डीपी मी ठेवलेला आहे. २) मी कितीही रागात असलो, संतापलेलो असलो तरी ‘अजित’ असे कधीच म्हणत नाही. मी अजित पवार असाच उल्लेख करतो आणि शांत असलो तर ‘अजितदादा’ असे म्हणतो. हे आता मखलाशी, मस्का पाॅलिसीसाठी लिहीत नाही. मी जे बोलतो ते स्पष्टच बोलतो. ३) हे खोटं चॅट वायरल करताना, ‘दलित आणि मुस्लिमांना पैसे देऊन बोलव,’ असे वाक्य माझ्या तोंडून निघाले आहे, असे दाखवितानाही हे चॅट करणाऱ्यांची धर्मद्वेषी, जातीद्वेषी मानसिकताच उघडकीस आली आहे. हे खोटं चॅट लिहितानाही या विकृत मानसिकतेच्या लोकांच्या मनातील दलित आणि मुस्लिमांबद्दलचा द्वेषच उघडा पडला आहे. ४) दीपक केदार याची आणि माझी कुठेतरी एकदाच भेट झाली असून फक्त दोन ते तीन वेळा त्याच्याशी बोलणे झाले आहे. दीपक केदारचा उल्लेख करून आंबेडकरी नेता असा उल्लेख करत मनातला दलीत वेष उघड केला ५) #सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या ज्या नंबरचा वापर माॅर्फ चॅटिंगसाठी करण्यात आला. तो नंबर म्हणजे 9930000001 हा साधा वाॅटसॲप आहे. मात्र, ज्यांनी खोटी चॅट तयार केली. त्यांनी या नंबरवरील वाॅटसॲप #बिझनेस असल्याचे दाखविले. म्हणजेच, केवळ कुणाला तरी खुष करण्याच्या नादात स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारून घेतली आणि उघडे पडले. असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मला लक्ष्य करण्यासाठी खोटं लिहीले आणि एक्स्पोज झाले. या खोट्या चॅटसाठी कामाला लागलेली टीम अजितदादा यांना माहितही नसेल. पण, असे काही तरी उद्योग करून अजितदादांकडून स्वतःचा उदोउदो करून घेण्यासाठीच हा बालहट्ट केला अन् स्वतःच्याच पायात पाय अडकून उताणे पडले. खोटे करायलाही डोके लागते, असेही जितेंद्र आव्हाडांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *