बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारामुळे राज्यात मोठया प्रमाणात असुरक्षिततेची भावना समाजात व विशेषतः महिला वर्गात निर्माण झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी उरण, कोपरखैरणे या ठिकाणी अशाच घटना घडल्या. त्यामुळे राज्यात “लाडकी बहिणी योजनेपेक्षा सुरक्षित बहीण हवी” या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या व युवासेना कार्यकारीणी सदस्या यांनी पोलीस महासंचालक डॉ. रश्मी शुक्ला यांची भेट घेतली.
राज्यांच्या महिला सुरक्षिततेसाठी लाडक्या बहिणीचा प्रतिकात्मक चेक महासंचालक यांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देऊ केला मात्र त्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला. बदलापूर घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी व या घटनेत दिरंगाई करणाऱ्या पोलीस, शाळा व्यवस्थापनावर कारवाई व्हावी अशा मागणीचे निवेदन पोलीस महासंचालक यांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले.
राज्यात होत असलेल्या अत्याचाराच्या घटना या सरकार उघड्या डोळ्याने बघत आहे. या घटना रोखण्यास पोलीस दल कुचकामी ठरलं आहे. तसेच या घटना रोखण्यास महायुतीचे सरकार देखील अपयशी ठरल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच या घटनेवरून राजकारण सुरू आहे, असं म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनता उत्तर देण्यास सक्षम आहे, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी मुख्यमंत्री यांनी केलेल्या टिकेवर व्यक्त केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदार ऋतुजा लटके, उपनेत्या विशाखा राऊत, माजी महापौर व उपनेत्या किशोरी पेडणेकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेत्या राजुल पटेल, उपनेत्या शीतल देवरुखकर - शेठ, रंजना नेवाळकर, प्रवक्त्या व उपनेत्या संजना घाडी, युवासेना कार्यकारिणी सदस्या ऍड. गुरशीन कौर सहानी, धनश्री कोलगे, अश्विनी पवार, राजोल पाटील, दिक्षा कारकर, धनश्री विचारे आदी उपस्थित होत्या.