अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी हल्ला करण्यात आला आहे. गुरुवारी पहाटे वांद्रेमधील सैफच्या राहत्या अपार्टमेंटमध्ये हा हल्ला झाला. या हल्लेखोराचं फुटेज समोर आलं आहे. यात हा हल्लेखोर स्पष्ट दिसतोय. मुंबई पोलिसांनी देखील या हल्लेखोराचं फोटो प्रसिद्ध केला आहे. या फोटोशी जुळणारं हे फुटेज आहे. त्यामुळे याच व्यक्तीना सैफवर हल्ला केल्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक अज्ञात व्यक्ती त्याच्या घरात शिरली होती. यावेळी दोघांमध्ये झालेल्या वादात चोराने सैफ अली खानवर सहा वेळा वार केले. त्यापैकी दोन खोलवर होते. या हल्ल्यात सैफ अली खानच्या मानेला, डाव्या मनगटाला आणि छातीला दुखापत झाली आहे. चाकूचा एक छोटासा भाग अभिनेत्याच्या मणक्यालाही लागला आहे. पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.
मध्यरात्री तीनच्या सुमारास हा अज्ञात व्यक्ती इमारतीच्या पाईपवरुन बेडरूममध्ये घुसली, अशी माहिती समोर आली आहे. तर काही जणांनी, ही व्यक्ती आधीच घरात दबा धरून बसली होती. ही व्यक्ती बेडरूममध्ये शिरली. ही बेडरूम तैमूरची असल्याची माहिती आहे. या खोलीत अज्ञात व्यक्तीचा मोलकरणीसोबत वाद झाला. दोघांमधील वादाचा आवाज ऐकून अभिनेता सैफ अली खान तिथे आला. काही कळायच्या आत त्याने सैफवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफच्या घरात काम करणारी अरियामा फिलिप उर्फ लिमा ही महिला कर्मचारी जखमी झाली आहे. तिच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.