‘बाई माणूस’, ‘न्यूड’, ‘गंगुबाई’, ‘लापता लेडीज’ या सर्वच चित्रपटाने मला माणूस म्हणून खऱ्या अर्थाने घडवले. त्या पूर्वी माझे जूने किंवा बुरसटलेले विचार होते. ते या चित्रपटांच्या माध्यमातून सुधारले गेले. मी रस्त्यावर उतरून समाजसेवा करू शकत नाही. पण मी माझ्या चित्रपटाच्या माध्यमातून समाजसेवा करू शकते. कारण जेव्हा जेव्हा मी हारत असल्यासारखे वाटते तेव्हा तेव्हा या चित्रपटातील व्यक्तिरेखा मला खरी ताकद देतात, अशा भावना अभिनेत्री छाया कदम यांनी व्यक्त केल्या.        

बालगंधर्व रंगमंदिरांच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवाराच्या वतीने ३ दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात आज दुसऱ्या दिवशी अभिनेत्री छाया कदम यांना ‘उंच फडकली मराठी ध्वजा’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी राज काझी यांनी छाया कदम यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते.

नाटककार वामन केंद्रे यांच्या अभिनयाच्या वर्कशोप पासून दिग्दर्शक नागराज मंजुळे, संजयलीला भंसाली ते किरण राव आदी दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेत्री छाया कदम यांचा जीवन प्रवास आज उलगाडला. यावेळी छाया कदम म्हणाल्या, राज्यस्तरीय कबड्डी पटू असून देखील मी फिल्मी पद्धतीने या क्षेत्रात आले. नाटककार वामन केंद्रे यांनी माझ्यावर अभिनयाचे संस्कार केले. सुरवातीला अनेक वर्ष माझ्याकडे काम नव्हते पण ‘फॅड्री’ ने मला खरी ओळख दिली. सुदैवाने माझ्या वाट्याला वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका आल्या. मग ती ‘न्यूड’ मधील चंदा अक्का असो किंवा ‘मडगाव एक्सप्रेस’ मधील कांचन कोंबडी असो. या सर्व भूमिकांवर रसिकांनी भरभरून प्रेम केले आहे. 

कान्स फेस्टिव्हल मधील अनुभवा बद्दल बोलताना छाया कदम म्हणाल्या, ‘All we imagine as light’  या चित्रपटासाठी आम्हाला या फेस्टिव्हलमध्ये स्टँडिंग ओवीयेशन मिळाले. तो क्षण आम्हा सगळ्यांसाठी भारावून टाकणारा होता. तिथल्या रसिकांना हिंदी येत नव्हते तरी देखील त्यांना तो चित्रपट कळाला. ही त्या चित्रपटाची ताकद आहे. तो क्षण आही पुरेपूर जगलो. प्रत्येक मराठी कलाकारांच्या वाट्याला हा अनुभव यावा अशी माझी अपेक्षा आहे. 

अमिताभ बच्चन यांच्यांशी काम करण्याच्या अनुभवा बद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ‘झुंड’ च्या आधी अमिताभजी यांच्या सोबत काम करण्याची संधी दोनदा आली होती. मात्र तेव्हा तारखा जुळल्या नाहीत. पण ‘झुंड’मध्ये मला त्यांच्या बायकोची भूमिका साकारायला मिळाली. काम करताना त्यांच्या सोबत खूप गप्पा मारयाच्या होत्या मात्र, ते जास्त बोलत नसायचे. त्यांना भेटायला जाताना मी नवीन कपडे देखील खरेदी केले होते, योगायोगाने एका प्रसंगात त्यांनी आपला हात हातात घेतला तेव्हा मला आपले एक स्वप्न पूर्ण झाल्या सारखे वाटले.हा किस्सा सांगताना संपूर्ण रंगमंचात मोठा हशा पिकाला होता.

दरम्यान, महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात चैत्राली माजगावकर यांचा बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम सादर झाली. त्यानंतर महिलांसाठी लावणी कार्यक्रम सादर झाला. तर उत्तरार्धात एकाच प्याला, बुवा तेथे बाया, गाढवाचं लग्न आणि दुरीतांचे तिमिर जावो या नाटकांचे नाट्यप्रवेश सादर करण्यात आले.