पुण्यातील बहुप्रतीक्षित भिमथडी जत्रेला आजपासून सुरुवात होत आहे. भिमथडी जत्रेत ग्रामीण जीवनशैली, खाद्यसंस्कृतीचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे. ग्रामीण जीवनाचे हे प्रदर्शन आज पासून सिंचन नगर येथील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर ग्राउंडवर आयोजित करण्यात येणार असून २५ डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. ग्रामीण कारागीर व उद्योजकांना शहरी प्रेक्षकांशी जोडण्याची परंपरा कायम ठेवत ही जत्रा सगळ्यांचे स्वागत करायला सज्ज झाली आहे. सकाळी १० ते रात्री १० दरम्यान, हे प्रदर्शन सुरू राहणार असून पुणेकरांना ग्रामीण कारागिरी व नाविन्यपूर्णतेचा अनुभव घेण्याची अनोखी संधी या प्रदर्शनात मिळणार आहे.
भीमथडी जत्रेत या वर्षी पद्मश्री (कै.) श्री अप्पासाहेब पवार यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या ठिबक सिंचन सुरू करण्यासह भारतीय शेतीमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव केला जाणार आहे. सुनंदा पवार यांनी आयोजित केलेल्या भीमथडी जत्रेत या वर्षी २३५ स्टॉल्स राहणार आहे. यातून ग्रामीण कारागीर व शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन ग्रामीण उद्योजकता व सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवली जाणार आहे.
या वर्षी भीमथडी जत्रेचे बैल जोडी व बैलगाडीच्या स्वरूपात असलेले भव्य प्रवेशद्वार थीमला साजेसे असे आहे. पारंपारिक शेतीच्या जोडीला आधुनिक शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, शेतीशी निगडीत औजारे यांची मुख्य गेटवर सजावट करण्यात आली आहे, या सोबतच बैल गाडी, झुली व गोंडे घातलेली खिलारी बैलजोडी आणि गवताने शेकारलेली कमान येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधणार आहे.
भीमथडी जत्रेचे यंदाचे हे १८ वे वर्ष आहे. या जत्रेत दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्राची कलासंस्कृती (गोंधळी, पोतराज, भारुड, पाथरवट, बुरुड, केरसोनीवाले, नंदीबैल) पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहेत. ग्रामीण खाद्य महोत्सवात – ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनविलेल्या हस्तकला, उन्हाळी पदार्थ, चटण्या, मसाले, लोणची, कपडे, फळे, पालेभाज्या, कडधान्य इत्यादी उत्पादने विक्रीस उपलब्ध असतील. भरड धान्यामध्ये ज्वारीचा पिझ्झा बेस ब्रेड, खाकरा, भरडधान्याची पीठे, ज्वारीच्या लाह्या यासह भगर, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई इत्यादी भरड धान्य विक्रीसाठी उपलब्ध असतील.
याशिवाय खाद्य विभागात खापरावरील पुरण पोळी, खान्देशी मांडे, जळगावच्या वांग्याचे भरीत, मासवडी, उकडीचे मोदक, विदर्भाची स्पेशल लंबी रोटी व वडा भात यांसह नॉन व्हेज विभागात नेहमी प्रमाणे कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, मालवणी फिश थाळी, राशिनचे सुप्रसिद्ध मटन, चिकन व मटन वडे असे विविध खाद्य पदार्थ पुणेकरांसाठी उपलब्ध असतील.