मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. एकीकडे मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर टीका-टीप्पणी करत आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीकास्र सोडलं आहे. पुण्यात भाजपाच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी ही टीका केली.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“भारतीय जनता पक्षाने मराठा आरक्षणाबाबत नेहमीच भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजातील गरीबांना आरक्षण मिळालं पाहिजे, असं आमचं दिवसापासूनचं मत आहे. खरं तर आरक्षणाची लढाई १९८२ साली सुरू झाली होती. त्यावेळी अण्णासाहेब पाटील यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना आरक्षण मागितलं होतं. मात्र, त्यांनी आरक्षण दिलं नाही. तेव्हापासून आजपर्यंत राज्यात अनेक सरकारे आलीत. शरद पवार हे स्वत: चार वेळा मुख्यमंत्री होते. मात्र, त्यांनी आरक्षण दिलं नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. केवळ आरक्षण दिलं नाही, तर ते आरक्षण उच्च न्यायालयात टीकवलं. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातदेखील दाखल करण्यात आलं होतं. मात्र, जोपर्यंत आम्ही सत्तेत होतो, तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने तीनवेळा मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. पण दुर्देवाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलं आणि मराठा आरक्षण रद्द झाले”, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“राज्यात पुन्हा एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर आम्ही मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. आज त्याचा फायदा मराठा समाजाला होतो आहे. राज्यात पोलीस भरती सुरू आहे. हजारो मराठा तरुणांना नोकरी लागली आहे. हे सगळं होत असतानादेखील ज्याप्रकारे मराठा आरक्षणाचं राजकारण सुरू आहे, ते दुर्दैवी आहे”, असे ते म्हणाले.

“आज राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. माझं उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांना आवाहन आहे की त्यांनी आधी मराठा आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट करावी. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणं मंजूर आहे का, हे त्यांनी आधी सांगावं. मात्र, महाविकास आघाडीचे तिन्ही नेते आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका घेत आहेत. मराठा आणि ओबीसी समजाला झुलवत ठेवण्याचं काम महाविकास आघाडीकडून सुरू आहे. महाविकास आघाडीचा हा बुरखा फाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही”, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.