kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

हा जनतेचा कौल नाही; काहीतरी मोठी गडबड आहे! विधानसभा निवडणूक निकालावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा जनतेचा कौल नाही. यात काहीतरी गडबड आहे आणि मोठी गडबड आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

निवडणूक निकालाचे सुरुवातीचे कल आल्यानंतर ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते. ‘विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून सुरुवातीच्या निकालात भाजपप्रणित महायुतीला २०० पेक्षा जास्त जागा मिळत असल्याचं दिसत आहे. तर, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मोठं नुकसान होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘हा लावून घेतलेला निकाल आहे. हा जनतेचा कौल नाही. शेतकरी, गरीब, कष्टकऱ्यांनी दिलेला हा कौल नाही. यामागे मोठं कारस्थान आहे. त्याशिवाय असं होऊच शकत नाही. आम्ही महाराष्ट्रभर फिरत होतो. शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रात वादळ उभं केलं होतं. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती. लोकांमध्ये प्रचंड रोष होता. गद्दारी आणि बेईमानीच्या विरोधात चीड होती. असं असताना शिंदे गटाला ५० च्या वर जागा आणि अजित पवारांना ४० जागा कुठल्या आधारे मिळू शकतात? शिंदे, फडणवीस, मोदी-शहांनी महाराष्ट्रात असे काय दिवे लावले होते,’ असा प्रश्न संजय राऊत यांनी केला.

‘महाराष्ट्रावर अदानीचं बारीक लक्ष होतं. अमेरिकेत अदानीवर झालेले आरोप खरंतर भाजपवर व शिंदेंवर होते. या निवडणुकीत अदानीनं पूर्ण ताकद लावली होती. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोदी-शहा इथून गायब झाले होते. या सगळ्यामागे मोठं कारस्थान आहे. हा निकाल जनतेचा कौल आहे असं मानायला आम्ही तयार नाही. लोकशाहीत जय पराजय होत असतात. पण हे निकाल लावून घेतले गेले आहेत. या निकालांवर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्याचा विश्वास बसू शकत नाही, असं राऊत म्हणाले.

भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीची विधानसभा निवडणुकीच्या निकालात सरशी झाल्याचं चित्र आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत महायुतीनं २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. हे चित्र फार बदलण्याची शक्यता नसल्यामुळं महायुती राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. अर्थात, कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार हे स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.