पवित्र तिरुपती मंदिरातील प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी मांसाहारी घटकांचा वापर करण्याबाबत तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) केलेल्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंध्र प्रदेश सरकारकडे सर्वसमावेशक अहवाल मागितला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी चिंता व्यक्त केली आहे आणि आरोपांची चौकशी सुरू केली आहे, ज्यामुळे महत्त्वपूर्ण राजकीय आणि धार्मिक वाद निर्माण झाला आहे.

टीडीपीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आधीच्या वायएसआर काँग्रेस पक्षावर (वायएसआरसीपी) तिरुपती येथील पूज्य श्री वेंकटेश्वर मंदिरात लाडू तयार करण्यासाठी शुद्ध तूपाच्या जागी गोमांस टालो, चरबीयुक्त मांस आणि माशांच्या तेलाचा वापर केल्याचा आरोप केला.

एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला ते संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले, तिरुमला लाडू हे निकृष्ट घटकांपासून बनवले गेले होते. यामध्ये तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला. तसेच वायएसआरसीपी सरकारने मोफत भोजन सेवेचा दर्जा खराब केला आणि निकृष्ट साहित्य वापरून भगवान व्यंकटेश्वराच्या लाडूलाही सोडलं नाही, असा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, आता शुद्ध तुपाचा वापर केला जात आहे आणि मंदिरातील सर्व वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे गुणवत्ता सुधारली आहे.

जगन सरकारच्या काळात प्राण्यांची चरबी मिसळली जात होती. त्यातून मंदिराच्या पावित्र्याला धक्का पोहोचला आहे. ते पुन्हा राखलं जाण्याची ग्वाही नायडू यांनी दिली आहे. चंद्राबाबूंनी हे आरोप करताना सांगितले की तिरूपतीच्या व्यंकटेश्वरांचा प्रसाद बनवण्यासाठी ‘पुअर क्वालिटी’ सामान वापरलं जात होतं. मात्र जगन मोहन यांचे सरकार आल्यानंतर त्याला हरताळ फासला गेला. सर्वात आधी या सरकारने तूप पुरवठा करणारं कंत्राट हे खाजगी संस्थेला दिले. या आधी नंदीनी या संस्थे मार्फत तूप पुरवठा केला जात होता. या तूपातूनच लाडू बनवले जात होते. मात्र जी खाजगी कंपनी जगन सरकार काळात तूप पूरवठा करत होती त्यांनी त्यात प्राण्यांची चरबी मिसळली असा आरोप नायडू यांनी केला आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थान आणि लॉर्ड व्यंकटेश्वरा ही आंध्र प्रदेशच्या लोकांची संपत्ती आहे. मोफत दिल्या जाणाऱ्या फुडची गुणवत्ताही ढासाळली आहे. आधीच्या वायएसआर सरकारनं लॉर्ड व्यंकटेश्वराचे लाडूही सोडले नाहीत. ज्या तूपात लाडू बनवले जायचे, त्या तुपात प्राण्यांची चरबीही जगन सरकार मिसळायचं काम केलं आहे. मात्र आपण या सर्व गोष्टी ठिक करणार आहोत. आपल्या सरकारने तूप पुरवठा करणाऱ्या खाजगी कंपनीला दूर केलं आहे. नंदीनी या संस्थे मार्फतच आता तूप घेतलं जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जगन मोहन रेड्डी यांचा पक्ष वायएसआर काँग्रेसनेही सीएम चंद्राबाबू नायडू यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

वायएसआरसीपीचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी म्हणाले, चंद्राबाबू नायडू यांनी दिव्य तिरुमला मंदिराच्या पावित्र्याला आणि कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेला हानी पोहोचवून मोठे पाप केले आहे. चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमला प्रसाद यांच्यावर केलेली टिप्पणी अत्यंत वाईट आहे. मानवजातीत जन्मलेली कोणतीही व्यक्ती असे शब्द बोलत नाही किंवा असे आरोप करत नाही. चंद्राबाबू नायडू राजकारणासाठी काहीही चुकीचे करायला मागेपुढे पाहणार नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

ते पुढे म्हणाले की, भक्तांचा विश्वास दृढ करण्यासाठी ते आणि त्यांचे कुटुंब तिरुमला प्रसादच्या बाबतीत शपथ घेण्यास तयार आहेत. चंद्राबाबू नायडू यांनाही त्यांनी तसे आव्हान दिले आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील तिरुमला टेकडीवर भगवान व्यंकटेश्वराला समर्पित तिरुपती मंदिर बांधले आहे. हे तिरुपती बालाजी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) द्वारे चालवले जाते. हे देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मंदिरांपैकी एक आहे.