kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मध्यप्रदेशात जबलपूरमध्ये रेल्वे अपघात, सोमनाथ एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये शनिवारी सकाळी मोठा रेल्वेअपघात झाला. सोमनाथ एक्स्प्रेस गाडी फलाटावर पोहोचण्याच्या अवघ्या २०० मीटर आधी दोन डबे रुळावरून घसरले. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. पश्चिम मध्य रेल्वेचे सीपीआरओ हर्षित श्रीवास्तव यांनी सांगितले की, २२९१ ट्रेन इंदूरहून जबलपूरकडे येत होती. ट्रेन जबलपूर प्लॅटफॉर्म क्रमांक-६ च्या दिशेने जात होती. ट्रेन थांबणार असतानाच अचानक तिचे दोन डबे रुळावरून घसरले.

याचबरोबर, या ट्रेनचा वेग खूपच कमी होता, त्यामुळे प्रवाशांना कोणतीही हानी झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप असून ते आपापल्या घरी रवाना झाले आहेत. ही घटना ५.५० च्या सुमारास घडली, जेव्हा ही ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचणार होती, असेही हर्षित श्रीवास्तव यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये रेल्वे अपघाताच्या घटना वाढल्या असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ साबरमती एक्सप्रेसचे २२ डबे रुळावरून घसरले होते.