अभूतपूर्व, अनाकलनीय, अविश्वसनीय या तीन शब्दांत पंधराव्या विधानसभेच्या निकालाचे वर्णन करावे लागेल.अभूतपूर्व म्हणजे या पूर्वी असे घडले नाही असे. यापूर्वी असा निकाल महाराष्ट्राने कधीच पाहिला नव्हता. २०१४ च्या ‘मोदी लाटेत’ही जे घडले नव्हते ते आता घडले. महायुतीने तब्बल दोनशे छत्तीसवर जागा जिंकून महाविकास आघाडीची धूळधैना करीत सुपडा साफ केला. महाराष्ट्रात महायुती लाट नव्हे तर त्सुनामी आली. या लाटेत महाविकास आघाडीचे सर्व गट उध्वस्त झाले. मविआच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
ही त्सुनामी एवढी प्रचंड होती की ,पाच महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी अजिंक्य वाटत असतानाच तिला अर्धे शतकही पार करता आले नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेला विरोधीपक्ष नेता मिळणार नाही अशी अवस्था झाली आहे. खरोखरच अभूतपूर्व असेच आहे, आणि अनाकलनीय या अर्धाने की असा निकाल लागेल असा अंदाज कोणालाच वाटले नव्हते.
महाराष्ट्रातीलच नाही तर देशातीभरातील राजकीय धुरिणांना असा निकाल लागेल ही अपेक्षा नव्हती. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील महायुतीच्या व भाजप नेत्यांना देखील हा इतका विराट विजय मिळेल असे वाटले नसेल. भल्या भल्याभल्यांना विचार आणि अभ्यास करायला लावणारा हा निकाल आहे. महायुतीच्या नेत्यांना महाविकास आघाडीपेक्षा थोड्याफार फरकाने पराभव किंवा विजय असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षांत आश्चर्यकारक निकाल जनतेला पाहवा लागला.
अविश्वसनीय या अर्थाने की या निकालावर अजूनही अनेकांना विश्वास ठेवणं कठीण जात आहे. कारण नुकत्याच लोकसभा निवडणुकीत पूर्णपणे वेगळे चित्र पहायला मिळाले होते. या वरील सर्व बाबींचा विचार केला तर अजूनही विश्वास बसत नाही हे म्हणावे लागत आहे.
तसेच म्हणावे लागत आहे की, महाविकास आघाडीची जगा वाटप असो किंवा प्रचार सभा घेण्यात एकजुटीचा अभावामुळे पानिपत झाले असो हे आघाडीच्या नेत्यांना उघड्या डोळ्यांनी पाहवे लागले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री पदावरून आघाडीत रस्सीखेच, निवडणुकीपूर्वी कुरघोडी केली जात होती. याचा फायदा महायुतीने हेरून चाणिक्यनितीने पावले टाकत महाविजय मिळवला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही !
(लेखक: ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य , फोन : 9930154028)