राज्यात प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा ठरला आहे. महाराष्ट्र दिनापासून त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केला आहे. सुरुवातीला आरोग्य, परिवहन, पोलीस, वनविभाग यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे.मनुष्यबळा आभावी प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण होत होते. नेमणुकीवर असलेल्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत होता. त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणीवंर मात करण्यासाठी प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. महाराष्ट्र दिनापासून काही विभागांनी कामकाजात कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर सुरू केला आहे. प्रशासकीय कामकाजात एआय तंत्रज्ञानाचा वापर करणारा सिंधुदुर्ग हा पहिलाच जिल्हा असणार आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शरद कृषी भवनात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) प्रणालीचे उद्घाटन आणि लोगो अनावरण नुकतेच संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान कृषिकेश रावले यांनी या संपूर्ण ‘एआय’ प्रणालीच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेली अडथळे ‘एआय’च्या मदतीने दूर करता येतील. ‘एआय’ प्रणाली कोणत्याही कर्मचाऱ्याची नोकरी हिरावून घेणार नाही, तर ती केवळ आवश्यक माहिती आणि डेटा पुरवून सर्वांना एकत्रित करण्याचे काम करेल. सामान्य नागरिकांचा जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालयातील कामासाठी लागणारा वेळ कमी होईल. शेतकऱ्यांसाठी ‘शेतकरी मित्र’ तयार करण्यात येत आहे, ज्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होईल आणि ते आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील. वन विभागातील कर्मचाऱ्यांची आणि साधनसामग्रीची कमतरता लक्षात घेता, ‘एआय’च्या साहाय्याने प्राण्यांच्या हालचाली आणि सवयींचा अभ्यास करून लोकांना सतर्क केले जाईल आणि कर्मचारी अधिक प्रभावीपणे काम करू शकतील. पोलीस विभागाला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास आणि घरफोडीसारख्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Leave a Reply